अहिल्यानगर-सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी यांच्या चास (ता. अहिल्यानगर) शिवारातील शेतजमिनीत अनधिकृतपणे प्रवेश करून नुकसान करत त्यांना दमदाटी केली. बुधवारी (4 मार्च) दुपारी 12 ते सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान चास शिवारातील गट नंबर 716, 714 व 1096/1 येथे ही घटना घडली.
याप्रकरणी सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी अॅड. रमेश पंढरीनाथ काळे (वय 59, सध्या रा. बळवंतनगर, नाशिक, मूळ रा. चास) यांनी गुरूवारी (5 मार्च) अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अरूण सहादू गोंडाळ, अमर सहादू गोंडाळ व पोकलेन चालक (नाव माहिती नाही, सर्व रा. चास) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अॅड. रमेश काळे हे अप्पर जिल्हाधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले असून ते नाशिक येथे राहतात. त्यांची चास शिवारात गट नंबर 716, 714 व 1096/1 मध्ये शेतजमिन आहे. बुधवारी दुपारी 12 ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चास येथील त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीत संशयित आरोपींनी अनाधिकृतपणे प्रवेश केला. या वेळी संशयित अरूण गोंडाळ, अमर गोंडाळ व त्यांच्यासोबत असलेल्या पोकलेन चालकाने शेतातील झाडांचे नुकसान केले. तसेच अॅड. काळे यांना दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
अॅड. काळे यांनी सदरची घटना तालुका पोलिसांना सांगितली. पोलिसांनी गुरूवारी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास महिला पोलीस अंमलदार रेपाळे करीत आहेत.


