राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पदाधिकारी निवडी जाहीर
“कामाच्या माध्यमातून पदाला न्याय द्या” – आ. संग्राम जगताप
युवक, ओबीसी, भटक्या विमुक्त जाती व एसटी महामंडळ जिल्हा अध्यक्ष पदांसाठी नवी नियुक्ती
अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) च्या विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. युवक शहर जिल्हाध्यक्षपदी सूरज कोतकर, ओबीसी शहर जिल्हाध्यक्षपदी दीपक खेडकर, कार्याध्यक्षपदी नितीन घोडके, भटक्या विमुक्त जाती शहराध्यक्षपदी सूरज शिंदे, तर एसटी महामंडळ अध्यक्षपदी ज्ञानदेव अकोलकर यांची निवड करण्यात आली.निवडीचे पत्र आमदार संग्राम जगताप आणि शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी, नगरसेवक आणि मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, मिळालेले पद हे फक्त व्हिजिटिंग कार्डपुरते नसून जबाबदारीचे आहे.
पदाच्या माध्यमातून समाजातील लहानमोठे प्रश्न सोडवा, नागरिकांशी स्नेहाचे संबंध प्रस्थापित करा.कामाच्या माध्यमातूनच पदाला न्याय देता येतो आणि समाजात आपली ओळख निर्माण होते.पदाचा उपयोग लोकसेवेसाठी करा सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून समाज एकत्र आणा.नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करणारा ‘कामाचा माणूस’ म्हणून आपली छाप पाडा.हेच खरे कार्यकर्तृत्व आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर म्हणाले, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीला साजेसे काम करून दाखवा.कुठल्याही पदावर असताना स्वार्थ बाजूला ठेवून प्रामाणिकपणे काम करा.पद हे जबाबदारीचे आहे. समाजातील प्रश्न सोडविणे, शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणे हीच खरी कार्यकर्त्यांची ओळख आहे.
नवनियुक्त पदाधिकारी सुरज कोतकर, दीपक खेडकर, नितीन घोडके, सुरज शिंदे आणि ज्ञानदेव अकोलकर यांनी संयुक्तपणे सांगितले, आम्ही आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहरातील जनतेच्या प्रश्नांवर काम करू.
मिळालेल्या पदाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक बदल घडवू आणि पक्षाची ताकद वाढवू.या कार्यक्रमाला प्रा. माणिकराव विधाते, माजी नगरसेवक दगडू मामा पवार,नगरसेवक विकी जगताप, अविनाश घुले, अमोल गाडे, गटनेते प्रकाश भागानगरे, रेवणनाथ पवार, विशाल नाकाडे,
रवींद्र बारस्कर, बापूशेठ नागरगोजे आदी मान्यवर उपस्थित होते.


