राज्यात लाखो महिलांकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला जात आहे. मात्र, या योजनेचा लाभ काही महिलांनी अपात्र असतानाही घेतल्याचे उघडकीस येत आहे. सरकारी पदावर कार्यरत असताना गलेलठ्ठ पगार घेऊनही काही महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आलं आहे. राज्यातील २ हजारांहून अधिक महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे उघडकीस आलंय. या सरकारी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या प्रकारावर अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
लाडकी बहीण योजनेचा सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या लाभावर अजित पवारांनी भाष्य केलं. अजित पवार म्हणाले, ‘लाडकी बहीण योजना आली, त्यावेळेस आम्हाला जास्त वेळ मिळाला नाही. त्यानंतर लगेच निवडणुका आल्या. त्यामुळे तपासण्या करण्यासाठी वेळ मिळाला नाही. आम्ही आवाहन केलं होतं. ज्यांना गरज आहे, त्यांनीच लाभ घ्यावा. मात्र आता दिलेले पैसे तर परत घेता येणार नाही. यावर नक्कीच मार्ग काढू. आता कशाला कारवाई करायला सांगताय? चुकलंय, त्यानी नको करायला होता’.
पुण्यातील अपघाताच्या घटनेवर अजित पवार काय म्हणाले?
“पुण्यातील भावे हायस्कूलजवळ एका कारनं ११ विद्यार्थ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. या अपघाताबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “मी सकाळी आल्यानंतर सर्वात आधी या घटनेची माहिती घेतली. त्या घटनेत काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यातील काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे होते. त्या कारची चावी मालकाकडून तशीच राहिली आणि पुढे कार चालकाकडून ही घटना घडली. तो चालक मद्यधुंद होता. आता या प्रकरणात एकाला रात्री अडीच वाजता अटक करण्यात आलं आहे”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.


