राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण 49 इच्छुकांनी 103 उमेदवारी अर्जांची खरेदी केली असून, एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. निवडणूक प्रक्रियेअंतर्गत दि. 30 मार्च 2026 रोजी 15 व्यक्तींनी 31 अर्जांची खरेदी केली होती. त्यानंतर दि. 1 एप्रिल रोजी 21 इच्छुकांनी 40 अर्ज घेतले. तर दि. 2 एप्रिल रोजी 13 व्यक्तींनी 32 अर्जांची खरेदी केली आहे. एकूण तीन दिवसांत 49 व्यक्तींनी 103 अर्ज घेतल्याने निवडणुकीबाबतची उत्सुकता आणि रंगत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र, अद्यापपर्यंत केवळ एकच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाला असून अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. आगामी दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेग घेण्याची शक्यता असून, प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष इच्छुकांच्या हालचालींनाही वेग आला आहे. त्यामुळे राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणूक चुरशीची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, युवानेते अक्षय कर्डिले यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाली असून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे खात्रीलायक समजते.
मात्र याबाबत अधिकृत घोषणा झाली नसल्याने संभ्रम कायम आहे. महाविकास आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस पक्षानेही आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी हलचाली सुरू केल्याची माहिती एका पदाधिकार्याने दिली आहे. यामुळे राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक ही बहुरंगी होण्याचे चिन्हे दिसत आहे. तसेच महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या इच्छूक उमेदवारानेही अर्ज नेल्याने शिंदे गट पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचं चित्र नऊ एप्रिलला स्पष्ट होईल. तत्पूर्वी मात्र अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राहुरी पोटनिवडणुकीसाठी एकनाथ शिंदे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते रामचंद्र शेटे यांच्या पत्नी सविता रामचंद्र शेटे (शिवसेना – एकनाथ शिंदे गट, रा. पिंप्री वळण) आणि शिवसेनेचे शेतकरी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रविंद्र बापुसाहेब मोरे यांनी अर्ज नेल्यानं, महायुतीत खळबळ उडाली आहे.


