केंद्र शासनाकडून आश्रमशाळेसाठी मिळालेल्या अनुदानात तब्बल २ कोटी ४८ लाख रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मयत कर्मचार्याच्या नावे पगार लाटणे आणि निधी खाजगी खात्यात वळवल्याप्रकरणी समाजकल्याण विभागाचे सहायक लेखाधिकारी संदीप हरिभाऊ देठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात संस्थेच्या अध्यक्षासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिंगार येथील सद्गुरु रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठान’ या संस्थेने २०१५ ते २०२० या कालावधीत केंद्र शासनाच्या grants-msje.gov.in या पोर्टलद्वारे केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेसाठी अनुदान मिळवले होते. शासनाने संस्थेच्या खात्यावर २ कोटी ४८ लाख २१ हजार ४२४ रुपये जमा केले. नियमानुसार हा निधी कर्मचार्यांचे वेतन आणि शाळेच्या भौतिक सुविधांवर खर्च होणे अपेक्षित होते.मात्र, संस्थेचे अध्यक्ष आणि पदाधिकार्यांनी संगनमत करून हा निधी शाळेसाठी न वापरता, तो ’श्रद्धा एंटरप्रायजेस’, सुभाष साळवे, क्षितिज शर्मा व इतर नातेवाईकांच्या वैयक्तिक खात्यावर (सुमारे २ कोटी २४ लाख रुपये) परस्पर वळविला. धक्कादायक बाब म्हणजे, अनिल शंकरराव कांबळे या कर्मचार्याचा मृत्यू झालेला असतानाही, त्यांच्या नावे वेतन काढून शासनाची फसवणूक करण्यात आली. तसेच एकाच कर्मचार्याला शाळा आणि वसतिगृह अशा दोन्ही ठिकाणी कामावर दाखवून बनावट कागदपत्रे तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे, उपाध्यक्ष मंगल अनिल शिंदे, सचिव अनिल तुळशीदास शिंदे, विश्वस्त संजय बन्सी साळवे, खजिनदार सौ. अनिता सुभाष साळवे, विश्वस्त राजू बन्सी साळवे आणि रेखा संजय साळवे (सर्व रा. भिंगार, अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


