Sunday, March 15, 2026

नगर-पुणे महामार्गावर एकाच दिवशी २ भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

अहिल्यानगर – नगर-पुणे महामार्गावर १२ मार्च रोजी एकाच दिवशी झालेल्या २ वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. चास शिवारात सकाळी ९.१० च्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, त्यांचे नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अमोल रावसाहेब रासकर (वय २६, रा. चास, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची आई संगीता रावसाहेब रासकर आणि चुलत मामा दत्तात्रय आगरकर हे आपल्या दुचाकीवरून चास येथून अहिल्यानगरच्या दिशेने जात होते. यावेळी हेमराज फार्म्ससमोर पाठीमागून येणाऱ्या महिंद्रा एक्सयुव्ही ४०० (क्र.एमएच १६ डीडब्ल्यू ४३७१) कारच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अविचाराने आणि हयगयीने चालवून दुचाकीला जोराची धडक दिली.

​या धडकेत फिर्यादीच्या आईचा जागीच मृत्यू झाला, तर मामा गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी किंवा दवाखान्यात नेण्याऐवजी आरोपी चालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार जायभाय हे करीत आहेत.

दुसरा अपघात जातेगाव घाटात (ता.पारनेर) येथे समाधान हॉटेल समोर रात्री ९.३० च्या सुमारास घडला. भरधाव वेगातील एका अज्ञात वाहनाने लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेने पायी चाललेल्या व्यक्तीला धडक दिली. या धडकेत प्रभाकर वामन खर्चे (वय ५८, रा. आडविहीर, ता. मोताळा, जि. बुलढाणा) हे गंभीर जखमी होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक वाहन घेवून पसार झाला.

याबाबत मयताचा चुलत भाऊ उदयकुमार ज्ञानदेव खर्चे (वय ५२, रा. आडविहीर, ता. मोताळा, जि. बुलढाणा) यांनी सुपा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles