शेवगाव-तालुक्यातील ठाकुर पिंपळगाव शिवारात शनिवारी (दि.9) अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केवळ 12 तासांत खूनाचा छडा लावत विजय चंदर कडमिंचे (वय 20) व अरुण लाला उपदे (वय19, दोघेही रा.रामनगर) यांना ताब्यात घेतले. शिकारीला गेल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून लोखंडी गजाने डोक्यावर मारून आकाश लक्ष्मण कडमिंचे (वय 20, रा. रामनगर, शेवगाव) याचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, शेवगाव तालुक्यातील ठाकुर पिंपळगाव शिवारात शनिवारी (दि.9) ऊसाच्या शेतात अंदाजे 20-22 वर्षे वयाच्या अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला होता.
याबाबत विष्णू भानुदास दहिफळे (रा. ठाकुर निमगाव, ता. शेवगाव) यांनी दिलेल्या माहितीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. अकस्मात मृत्यू हा संशयास्पद असल्याने पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून तपासासाठी पाठविण्यात आले. पथकातील हृदय घोडके, फुरकान शेख, किशोर शिरसाठ, सागर ससाणे, प्रमोद जाधव, प्रशांत राठोड, उमाकांत गावडे हे पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने मृतदेहाची बारकाईने पाहणी केल्यानंतर मृताच्या डोक्यात मारहाण केल्याच्या जखमा दिसून आल्या.
यानंतर परिसरामध्ये राहणार्या नागरिकांकडे चौकशी केली. घटनास्थळासह आजुबाजूस सीसीटीव्ही नसल्याने मयताची ओळख पटविणे अवघड झाले. तांत्रिक कौशल्य व गुप्तबातमीदारांच्या माहितीवरून मिळालेल्या माहितीनूसार अनोळखी मयताचे नाव आकाश लक्ष्मण कडमिंचे असे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी विजय कडमिंचे व अरुण उपदे यांना ताब्यात घेतले. तपासाअंती हे दोन आरोपी शिकारीसाठी ठाकुर पिंपळगाव परिसरामध्ये गेले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये शिवीगाळ झाल्याने आकाशच्या डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करून त्याच्या खुनाची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन शेवगाव पोलीसांकडे पुढील तपासासाठी ताब्यात दिले. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे करीत आहेत.