अहिल्यानगर-वाढत्या मानव-बिबट्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार नियोजनमधून ८ कोटी १३ लाख ४४ हजारांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून पिंजरे, रेस्क्यू उपकरणे खरेदी करण्यात आले असून अहिल्यानगर वन विभागाच्या ताफ्यात नव्याने २०० पिंजरे दाखल झाले आहेत.अहिल्यानगर वन विभागात १ हजार १५० हून अधिक बिबट्यांची संख्या आहे. मागील काही वर्षात जंगलातील बिबटे पाणी व शिकारीच्या शोधात मानवी वस्तीपर्यंत दाखल झाले आहेत. नागरिक व पाळीव प्राण्यांवर बिबट्यांचे हल्ल्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने वन विभागाने जिल्ह्यातील ८९७ गावे संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत. सध्या वन विभागाकडे ३०५ पिंजरे आणि ३ थर्मल ड्रोन उपलब्ध आहेत. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी त्यांचा वापर करण्यात येतो.
आता आणखी २०० पिंजरे वनविभागाला प्राप्त झाली असल्याने बिबट्यांना पकडण्यासाठी मदत होणार आहे. मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मागील काही दिवसांत वनविभागाने ३० हन अधिक बिबट्यांना पकडून सुरक्षित स्थळी ठेवले आहे. पकडलेले बिबट्यांना गुजरात येथील वनतारा प्रकल्पात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला आहे. सुमारे ५०० बिबट्यांच्या टप्प्याटप्प्याने स्थलांतराचा वनविभागाचा विचार आहे.
वनविभागाला ३०० ट्रॅप कॅमेरे, जॅकेट, शूज, टॉर्च गन्स आणि संरक्षणात्मक किट यांसारखी रेस्क्यू उपकरणे मिळाली आहेत. जिल्हा नियोजनच्या निधीतून २२ रेस्क्यू वाहने वनविभागाला देण्याचा निर्णय झाला आहे.
परिक्षेत्रनिहाय पिंजरे प्राप्त
कोपरगाव २९, पारनेर ३७, संगमनेर ५१, नगर २३, श्रीगोंदा १४, पाथर्डी १०, अकोले १४, राजुर १०, राहुरी ७, टाकळी ढोकेश्वर ५ एकूण २०० असे आहेत.
जिल्हा नियोजनमधून प्राप्त झालेल्या निधीतून वनविभागाला २०० पिंजरे मिळाले आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या वनपरिक्षेत्रांना हे पिंजरे देण्यात आले आहेत. नागरिकांनी मानवी वस्तीजवळ बिबट्या आल्याची तक्रार केल्यानंतर तत्काळ पिंजरा लावून त्याला जेरबंद करण्यास मदत होणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्यावतीने देण्यात आली.


