मुळाधरणात एका 29 वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मयत झालेल्या तरुणाचे नाव रामा ज्ञानदेव माळी असे समजले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, जांभळी येथील लक्ष्मीबाई भागवत बाचकर यांच्या राहत्या घरी 9 जुलै रोजी रात्री चोरीची घटना घडली होती. तीन चोरट्यांनी लक्ष्मीबाई यांच्या गळ्यातील व घरातील 4 तोळ्याचे दागिणे चोरून नेले होते. याप्रकरणी लक्ष्मीबाई बाचकर यांनी आरोपी रवी (पूर्ण नाव माहित नाही) व इतर अनोळखी दोन असे तीन जणांवर गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी राहुरी पोलीस प्रशासनाचे पथक वावरथ-जांभळी हद्दीमध्ये तपासासाठी गेले होते. परंतु पोलीस प्रशासन तपासासाठी पोहोचताच दोघे जण मुळा धरणाच्या पाण्यात बुडाल्याची चर्चा झाली. दोघांपैकी संदिप बर्डे (वय 27) रा. गंगाधरवाडी (वावरथ) हा तरुण पाण्यात पोहत बाहेर पडला. परंतु रामा माळी हा तरुण पाण्यात बुडाल्यानंतर बाहेर न आल्याने पो. नि. संजय ठेंगे यांचे पथक दाखल झाले.
राहुरी पालिका प्रशासनाकडून पाणबुडी व अग्निशमन वाहन आणत पाण्यात तरुणाचा शोध सुरू होता. सुमारे तीन दिवस तरुणाचा शोध घेत असताना 13 जुलै रोजी सकाळी पाण्यात बुडालेला रामा माळी या तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. पोलीस प्रशासनाने मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करीत आहे.


