Tuesday, October 28, 2025

पारनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

पारनेर तालुक्यातील कळस येथे मंगळवारी (दि. 2 सप्टेंबर) रात्री साडेसातच्या सुमारास बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात गणेश तुळशीराम गाडगे (वय 40) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील सुतार वस्तीजवळ ही धक्कादायक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश गाडगे हे कळसहून रानमळ्याच्या रस्त्याने घरी परतत असताना बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. रात्री आठ वाजेपर्यंत ते घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता हा प्रकार उघडकीस आला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तेव्हाच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कळस परिसरात उसाचे प्रमाण जास्त असल्याने या भागात बिबट्यांचा वावर नेहमीच जाणवतो. यापूर्वी जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडल्या असल्या, तरी मानवी जीवितहानीची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. ग्रामस्थांच्या मते, रात्रीच्या वेळी शेतातून घरी परतताना अथवा बाहेर पडताना सतत धोका जाणवतो.

या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करणे, पिंजरे लावणे, रात्रीच्या वेळी गस्त वाढवणे अशा खबरदारीच्या उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे. वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून, परिसरात पिंजरे लावण्याचे नियोजन असल्याचे सांगितले आहे. तसेच ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

गणेश गाडगेंच्या निधनाने गावात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांनी प्रशासनाला त्वरित कारवाई करून बिबट्यांचा धोका कमी करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles