अहिल्यानगर शहरातील प्रमुख नाल्यांच्या सफाईचे ५० टक्के काम पूर्ण
मे अखेरपर्यंत सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करण्याचे महानगरपालिकेचे ठेकेदाराला निर्देश
ओढे-नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर होणार कारवाई; पथके नियुक्त करणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
अहिल्यानगर – शहरातील सर्व ओढे व नाल्यांच्या साफसफाईचे काम सध्या सुरू आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व नालेसफाई पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. सध्या स्थितीत प्रमुख नाल्यांची 50% साफसफाई पूर्ण झाली आहे. मे अखेरीपर्यंत नालेसफाईचे काम पूर्ण करण्याचे निर्देश ठेकेदार संस्थेला देण्यात आले आहेत. दरम्यान, नाल्यांची साफसफाई करताना मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व इतर कचरा टाकल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे यापुढे ओढे व नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई सुरू केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
महानगरपालिकेमार्फत सुरू असलेल्या नालेसोफाईच्या कामाचा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आढावा घेतला. सद्यस्थितीत सनी पॅलेस, सूर्य नगर ते अर्जुन वॉशिंग सेंटर नगर मनमाड रोड येथील नाल्याचे साफसफाईचे 80% काम पूर्ण झालेले आहे. गजराज फॅक्टरी जवळ काम चालू आहे. नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, मारुती मंदिर ते गंगा उद्यान ते सिव्हिल हडको ते दामोदर बिर्याणी हाऊस ते महावीर नगर, चिंतामणी हॉस्पिटल ते सुडके मळ्यापर्यंतचे नालेसफाईचे काम पूर्ण झाले आहे. तारकपूर सिव्हिल हॉस्पिटल मागील नाला ते सारडा कॉलेज हॉस्टेलजवळील नाला ते महावीर नगरपर्यंत नाल्याचे साफसफाई पूर्ण झाली आहे. सोनेवाडी रोड, केडगाव ते रेल्वे लाईन पर्यंतच्या नाल्याचे साफसफाईचे काम सुरू आहे. केडगाव अमरधाम देवी रोडपर्यंत काम सुरू असून 40% काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. तसेच, मंगल हाउसिंग सोसायटी ते कुष्ठधाम रोड मार्गे प्रेमदान हडको, ताठे नगर, धर्माधिकारी मळा, पंपिंग स्टेशनपर्यंतच्या नाल्याचे काम येत्या दोन दिवसात सुरू होऊन पुढील आठवड्यात ते पूर्ण होणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.
दरम्यान, नालेसफाई करताना ओढे व नाल्यांवर असलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला नागरिकांनी प्लास्टिक, टाकाऊ वस्तू व इतर कचरा मोठ्या प्रमाणात टाकल्याचे आढळून आले आहे. नालेसफाई करताना या कचऱ्यासह गाळ, पानगवत, झाडेझुडपे काढण्यात आली आहेत. नागरिकांनी उघड्यावर, नाल्यामध्ये कुठलाही कचरा टाकू नये. कचरा टाकताना आढळल्यास दंड करण्यात येणार आहे. यासाठी महानगरपालिकेचे स्वतंत्र पथके नियुक्त केली जाणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासन यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.


