Saturday, February 21, 2026

आषाढीसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार २०० विशेष बस, गावातून स्वतंत्र बसची व्यवस्था

पंढरपूर : आषाढी यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. तसेच कोणत्याही गावातून ४० प्रवाशांनी मागणी केल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र बसची व्यवस्था केली जाईल, असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली.

आषाढी यात्रा नियोजनासाठी पंढरपूर येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, एसटीचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, यंदा राज्यातील कोणत्याही गावांतून ४० अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच स्थानकातून बस प्रवाशांना घेऊन जाण्याअगोदर बसची देखभाल दुरुस्ती करावी. एसटी बसच्या दुरुस्तीसाठी ज्यादा तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशा सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या आहेत. यात्रा काळात गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गांवर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे. अशा फुकट्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी एसटीचे २०० सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात २४ तास नजर ठेवणार आहेत. भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रास्थानक अशी चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक आदी सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles