Wednesday, October 29, 2025

अहिल्यानगर जिल्हा परिषद शाळेतील 54 विद्यार्थ्यांची नवोदयसाठी विद्यार्थ्यांची निवड

अहिल्यानगर-नवोदय विद्यालय समितीमार्फत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी 18 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल 25 मार्च रोजी लागला असून त्यात जिल्हा परिषद शाळांनी विक्रमी यश मिळविले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित 60 जागापैकी 54 जागांवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.यात सर्वाधिक एकट्या अकोले तालुक्यातील 14 तर नेवासा तालुक्यातील 8, कर्जत तालुक्यातील 6 तर श्रीगोंदा आणि शेवगाव तालुक्यातील प्रत्येकी 5 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पहिल्यांदा नगर जिल्हा परिषदेच्या शाळेने नवोदय परीक्षेत एवढे मोठे यश मिळवले आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा शिक्षणाची गुणवत्तेचा आलेख वधारल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती, तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षांपासून मिशन आरंभ हा उपक्रम राबविला जात आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या नवोदय प्रवेशातील यशात दिसून येत आहे.

मिशन आरंभ अंतर्गत यापूर्वी जिल्हा परिषद सेस निधीतून जिल्हा परिषद शाळांना तिसरी व चौथीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पूर्व तयारी मार्गदर्शिका पुरविण्यात आलेल्या आहेत. तसेच या शैक्षणिक वर्षात पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरावरुन एकूण 11 सराव परीक्षा घेण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना झाल्याचे या निकालातून स्पष्ट होते. मार्च 2024 मध्ये चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या मिशन आरंभ परीक्षेतून 518 विद्यार्थ्यांची जिल्हास्तर गुणवत्ता यादीत निवड झाली होती. या विद्यार्थ्यांसाठी तज्ञ मार्गदर्शकांद्वारे वर्षभर ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले होते. या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपैकी 32 विद्यार्थ्यांनी नवोदयसाठी निवड झाली आहे. जिल्हा परिषद शाळेतील पात्र झालेले हे 54 विद्यार्थी एकूण 31 शाळांमधील आहेत. पात्र विद्यार्थ्यांपैकी 7 विद्यार्थी इस्त्रो शैक्षणिक सहलीसाठीही पात्र झाले होते.

नवोदयसाठीचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे यश आहे. वर्ष 2022 मध्ये 38 विद्यार्थी, वर्ष 2023 मध्ये 42 विद्यार्थी, वर्ष 2024 मध्ये 48 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. आता वर्ष 2025 मध्ये थेट 54 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या निकालाने जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तव केले आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे हे फळ आहे. या निकालाने समाजात जिल्हा परिषद शाळांची प्रतिमा उंचावली आहे.

– आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles