जामखेड मध्ये तरूणावर गोळीबार एक जखमी
जामखेड येथे तरूणावर फायरिंग करणारे ६ आरोपी २४ तासाचे आत अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )
जामखेड – जामखेड येथील विंचरणा नदीच्या पुलालगत रस्यावर लघवी करण्याच्या कारणावरून वाद झाले. यातुन आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांना लाथाबुक्क्यांने मारहाण करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी व साक्षीदार यांचे दिशेने तीन गोळया फायर केल्या त्यापैकी दोन गोळया हुकल्या व एक गोळी फिर्यादीचा मित्र कुणाल बंडू पवार (रा. पोकळेवस्ती, जामखेड) याच्या पायास लागली सदर घटना दि. १ जुन रात्री दहा वाजता घडली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे तातडीने घटनास्थळी दाखल घेत तीन पथके आरोपींच्या शोधार्थ पाठवली होती. अहिल्यानगर गुन्हे शाखेच्या पथकाने सदर घटनेतील सहा आरोपीच्या २४ तासात मुसक्या आवळल्या. सदर आरोपीवर जामखेड पोलीस स्टेशनला गु.र.नं.२९३/२०२५ बीएनएस कलम १०९, ११५ (२), ३५२, ३ (५) सह आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा सोमवारी पहाटे दाखल होता.
याबाबत जामखेड पोलीसात अदित्य बबन पोकळे (वय 20 वर्षे धंदा वॉशिंग सेंटर रा पोकळेवस्ती, जामखेड) याने फिर्याद दिली की, रवीवार दि. १ रोजी रात्री दहा वाजता विंचरणा नदीजवळ घर आहे तेथे पोकळे वस्तीवरील नागरीक व महीला होत्या. यावेळी एका चारचाकी वाहनातून तीन अज्ञात इसम उतरले व ते तेथे लघवी करू लागले त्यांना येथे लघवी करू नका महीला बसल्या आहेत. असे म्हणल्याचा राग आल्याने त्यांनी फिर्यादी आदीत्य पोकळे यास शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी तेथे कुणाल बंडु पवार (वय २० रा. जामखेड) आला तीन अज्ञातांनी त्यांच्याजवळील पिस्टलने या दोघांवर गोळीबार केला यामध्ये कुणाल पवार याच्या पिंढरीतून गोळी आरपार गेली. त्यामुळे त्याला जामखेड येथील खाजगी दवाखान्यात उपचार करून अहील्यानगर येथील दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल केले.
गोळीबार झाल्याची घटना घडल्यानंतर जामखेड पोलीस तात्काळ घटनास्थळी गेले परंतु तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. जामखेड येथे फायरिंग करून झालेल्या गुन्हयांची प्राथमिक माहिती मिळताच पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तात्काळ गुन्हयाचा तपास करणेबाबत आदेश दिले. त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार अतुल लोटके, शाहीद शेख, संदीप दरंदले, रोहित येमुल, किशोर शिरसाठ, गणेश धोत्रे, संतोष लोढे, फुरकान शेख, विजय ठोंबरे, सागर ससाणे, अमृत आढाव, रोहित मिसाळ, प्रशांत राठोड, भगवान धुळे अशांचे दोन पथक तयार करून गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणेकामी रवाना केले.
दिनांक २ रोजी सदर पथकाने गोपनीय व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयाचा तपास करत असताना सदरचा गुन्हा हा प्रभु रायभान भालेकर, (रा. निपाणी, संभाजीनगर) व त्याचे साथीदारांनी केला असून ते प्रवरासंगम (ता. नेवासा) मार्गाने किया सेल्टॉस व मारूती प्रोनिक्स अशा कारमधुन जात असल्याची माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीवरून पथकाने पंचासमक्ष प्रवरासंगम, ता. नेवासा येथे सापळा रचुन १) प्रभरायभान भालेकर, (वय ३३, रा. निपाणी, छत्रपती संभाजीनगर) २) नकुल विष्णु मुळे, (वय ४०, रा.खेडा ता. पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर), ३) शरद अंकुशराव शिंदे, (वय ३८, रा. पुसेगाव, ता.पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर), ४) गणेश गोविंद आरगडे, (वय ३०, रा. खंडाळा, ता.पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) रावबहादुर श्रीधर हारकळ, (वय ३५, रा.सारासिध्दी सोसायटी, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर) ६) सुशी ताराचंद गांगवे, (वय ३०, रा. पद्मपुरा, छत्रपती संभाजीनगर) अशांना ताब्यात घेतले.
सदर पथकाने पंचासमक्ष आरोपीच्या ताब्यातील किया सेल्टॉस कार क्रमांक (एमएच-२०-एफपी-६६२२ व मारूती सुझुकी) व कार क्रमांक (एमएच-२०-जीके-५५८६) असे वाहन आरोपी प्रभु रायभान भालेकर याने गुन्हयात वापरलेले लायसन्सचे पिस्टल, ०१ राऊंड व ०२ रिकाम्या पुंगळ्या असा मुद्देमाल जप्त केला. ताब्यातील आरोपींना विश्वासात घेऊन गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी प्रभु रायभान भालेकर हा त्याचे वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी त्याचे साथीदारासह (भूम जि.उस्मानाबाद) येथे गेला होता. वाढदिवस झालेनंतर जामखेड मार्गाने जात असताना रस्त्याचे कडेला लघवी करण्याचे कारणावरून त्याने त्याचेकडील शस्त्र परवाना असलेल्या पिस्टलमधुन फायरिंग केल्याची माहिती सांगीतली.
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यातील आरोपीना जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येत असून, गुन्हयांचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील करीत आहेत.


