अहिल्यानगर-शहरातील मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 37 हजार 155 मालमत्ताधारकांनी एकूण 25.09 कोटी रूपयांचा कर भरणा केला आहे. महानगरपालिका अधिनियमानुसार 30 जून 2025 पर्यंत सर्वसाधारण करावर 8 टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सवलतीचा लाभ घेऊन वेळेत कर भरावा व दंडात्मक कारवाईपासून बचाव करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, नविन आर्थिक वर्षात पाणीपट्टीच्या दरांमध्ये वाढ झाल्यामुळे काही प्रमाणात बिल वाटपास विलंब झाला होता. परिणामी एप्रिल महिन्यात मिळणारी 10 टक्के सवलत अनेक नागरिकांना मिळू शकली नाही.
मात्र नागरिकांना दिलासा देत मे महिन्यातही 10 टक्के सवलतीची मुदतवाढ देण्यात आली. या कालावधीत एकूण 33 हजाार 928 मालमत्ताधारकांनी 22.85 कोटी रूपयांचा कर भरून प्रतिसाद दिला. जून महिन्यात सवलतीच्या अखेरच्या टप्प्यात 3 हजार 186 मालमत्ताधारकांनी 2.24 कोटी रूपयांचा कर भरला आहे. सवलतीच्या या एकत्रित मोहिमेमध्ये नागरिकांकडून मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे महानगरपालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत एकूण 25.09 कोटी रूपयांचे उत्पन्न जमा झाले आहे. महानगरपालिकेने कर भरणा प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक करण्यासाठी विविध डिजिटल पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
महानगरपालिकेने सोशल मीडियाच्या माध्यमातून राबवलेल्या प्रभावी जनजागृती मोहिमेमुळे नागरिकांमध्ये सवलतीविषयी जागरूकता वाढली असून, याचा सकारात्मक परिणाम कर भरण्याच्या प्रमाणावर दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षासाठी 100 कोटी रूपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट असून, 30 जूननंतर सवलत कालावधी संपल्यानंतर थकबाकीदारांविरूध्द जप्ती व कठोर कारवाई मोहीम राबवली जाणार आहे.


