विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाही. सांगलीमधील चंद्रहार पाटील ठाकरेंची साथ सोडणार असल्याचे समोर आले आहे. शिवसेना नेते उदय सामंत यांनी तसे संकेत दिले आहेत. सांगली येथील कार्यक्रमात चंद्रहार पाटील यांनी सामंत यांची भेट घेतली, त्यांचा सत्कार केला. त्यानंतर चंद्रहार पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. चंद्रहार पाटील यांनी आमच्या गळ्यात हार घातला. पण चंद्रहार पाटील यांच्या गळ्यात एकनाथ शिंदे हे कधी हार घालायचं हे चंद्रहार पाटील यांनी ठरवावं, असे वक्तव्य उदय सामंत यांनी केले. त्यामुळेच लवकरच चंद्रहार पाटील शिंदेंच्या गोटात दाखल होणार असल्याचे बोलले जातेय. लोकसभा निवडणुकीत चंद्रहार पाटलांसाठी ठाकरेंनी काँग्रेससोबत वाद घातला होता. सांगलीची जागा खेचून आणली होती, आज तेच चंद्रहार पाटील साथ सोडणार असल्याचे दिसतेय.
उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांनी गुरूवारी सांगलीच्या विटामध्ये उदय सामंत यांची भेट घेऊन चांदीची गदा भेट दिली. त्याचप्रमाणे यथोचित त्यांचा सत्कार केला. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे एकनाथ शिंदे गटात जाणार का अशी राजकीय क्षेत्रात चर्चा रंगू लागली आहे. मंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत चंद्रहार पाटलांनी घेतलेल्या बैठकीमुळे चंद्रहार पाटील ठाकरेंची साथ सोडणार अशल्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आले.
डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश निश्चित मानला जात आहे. सांगलीच्या भाळवणीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रहार पाटलांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी चंद्रहार पाटलांकडून मंत्री सामंत यांना चांदीची गदा देखील भेट देण्यात आली.
चंद्रहार पाटील हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार होते. तर गेल्या काही दिवसांपासून चंद्रहार पाटील हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा सुरू आहे, या सर्वच पार्श्वभूमीवर पैलवान चंद्रहार पाटील यांच्या भाळवणी गावात मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेला कार्यक्रम,हा चंद्रहार पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे मानले जात आहे.


