संजय गांधी निराधार अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा
आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पाठपुराव्याला यश
अहिल्यानगर : संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान डी.बी.टी.च्या तांत्रिक अडचणीमुळे गेल्या ४ महिन्यापासून लाभार्थी वंचित होते. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबतची सर्व माहिती आमदार शिवाजीराव कर्डिले यांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने संजय गांधी शाखेचे नायब तहसीलदार गणेश भांनवसे यांच्याशी संपर्क साधू लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून त्यांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात हे अनुदान संजय गांधी योजनेच्या ११० लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा क्षण पाहायला मिळाला. आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी नेहमीच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला असल्याचे प्रतिपादन भाजप दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे यांनी केले.
नगर तालुका तहसील कार्यालय येथे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी नायब तहसीलदार गणेश भांनवसे यांच्याकडे केली. यावेळी भाजप दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे, दरेवाडी ग्रामपंचायत माजी सरपंच अनिल कराडे, बाबासाहेब धीवर, सुधीर देठे, खडसे पाटील आदीसह लाभार्थी उपस्थित होते.
(चौकट) नगर तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे आधार अपडेट नसणे, आधार बँकेला लिंक नसणे, आपल्या कोणत्या खात्याला आधार लिंक आहे व कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते माहीत नसणे. यामुळे तालुक्यातील ४०% लाभार्थ्यांना पेन्शन जमा होण्यास साठी अडचण निर्माण होत होती. आता आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून लाभार्थ्यांच्या डी.बी.टी द्वारे खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती वसंत शिंदे यांनी दिली.


