Wednesday, November 5, 2025

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांसाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची बैठक

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांसाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची बैठक

घरोघरी सर्वेक्षण करून साथरोग व जलजन्य आजारांच्या रुग्णांची माहिती संकलित करण्याचे निर्देश

चार महिने सातत्याने धूर, औषध फवारणी करण्याच्या उपायुक्तांच्या सूचना

अहिल्यानगर – पावसाळा सुरू झाला असून येत्या काही दिवसात मान्सून सक्रिय होणार आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या जलजन्य आजारांच्या, तसेच साथ रोगांच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य केंद्रात सर्व सुविधा उपलब्ध राहतील, याची दक्षता घ्यावी. आशा सेविका, परिचारिकांमार्फत घरोघरी सर्वेक्षण सुरू करावे, रुग्णांची माहिती संकलित करावी, पाण्याच्या टाक्या, हौदात ॲबेट टाकावे. डेंग्यूचे रुग्ण आढळलेल्या भागात तत्काळ औषध व धूर फवारणी सुरू करावी, असे निर्देश उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी आरोग्य विभागाला दिले.

पावसाळ्यातील जलजन्य आजार, साथरोग, डास नियंत्रण संदर्भात महानगरपालिकेत बैठक पार पडली. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, महानगरपालिकेचे सर्व वैद्यकीय अधिकारी, पाणीपुरवठा व शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

डायरीया, कावीळ, गॅस्ट्रो, टायफाईड या जलजन्य आजारांचे, तसेच, मलेरिया, डेंग्यू, चिकन गुनिया आदी आजारांचे रुग्ण पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळतात. आशा सेविका, परिचारिकांनी दररोज घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे. रुग्णांची माहिती संकलित करावी. खाजगी रुग्णालयाकडून रोज रुग्णांची माहिती संकलित करावी. सर्वेक्षणादरम्यान घर व आवारातील पाणीसाठा, टाक्या, हौदांची तपासणी करून, डास आळी सापडल्यास तेथील पाणी काढून टाकावे, डास अळीनाशक द्रव्य, पाण्यात ॲबेट टाकावे, डेंग्यूचे रुग्ण आढळून आलेल्या घर परिसरात औषध व धूर फवारणी करावी. सर्व उपाययोजनांबाबत नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या. धूर फवारणीसाठी १५ दिवसाची सायकल निश्चित करून प्रत्येक ठिकाणी नियमित उपाययोजना पावसाळा चार महिने कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

डेंग्यू व इतर आजारांबाबत डास प्रकार, आजारची लक्षणे, उपचाराबाबत व्यापक जनजागृती करावी. महानगरपालिकेमार्फत शहरातील सार्वजनिक इमारतीमध्ये टॉयलेट व्हेंट पाईपला नायलॉन जाळी लावण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. खाजगी बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी, टायर व्यवसायिक, इतर बेसमेंट असलेल्या आस्थापना आदी ठिकाणी मलेरिया कर्मचारी तपासणी करणार आहेत. डास किंवा अळी सापडणाऱ्या ठिकाणी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिक व व्यावसायिकानी घरात, व्यवसायच्या ठिकाणी डास अळी निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, वेळीवेळी आठवड्यातून एकदा पाणीसाठे रिकामे करून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. दरम्यान, धूर व औषध फवारणीसाठी मलेरिया विभाग प्रमुख तथा बायोलॉजिस्ट डॉ. सृष्टी बनसोडे (८६०००७१०९१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles