Tuesday, November 4, 2025

राहुरीच्या डॉ. तनपुरे कारखाना निवडणुकीत 59.49 टक्के मतदान ,आज मतमोजणी होणार

राहुरीच्या डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागासाठी झालेल्या निवडणुकीत 12 हजार 662 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण 59.49 टक्के मतदान झाले. कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वसाधारण, महिला, इतर मागासवर्ग व अनुसुचित जाती-जमाती मतदार संघात 21 हजार 93 मतदारांपैकी 12 हजार 474 म्हणजे 59.13 टक्के मतदारांनी आपल्या मतदान केले. तर सहकारी संस्था (ब वर्ग) मतदार संघात 98.94 टक्के मतदान झाले. या मतदार संघात 190 पैकी 188 मतदारांनी मतदान करून 56 उमेद्वारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेवटच्या निवडणुकीला टप्प्यात रंगत आली. सर्वच पॅनलने आपल्या सांगता सभेत मोठे शक्तीप्रदर्शन करून ऊस उत्पादक सभासद व कामगारांना अनेक आश्वासने देऊन आरोप-प्रत्यारोप केले. प्रत्येक उमेद्वारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष गाठी-भेटीवर भर दिला. या निवडणुकीत मात्र, उमेदवार व कार्यकर्ते यांच्या उत्साह दिसून येत होता. परंतू, ऊस उत्पादक सभासद मात्र शांततेत सर्व काही पाहत होते. काल राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती विद्यालयात सकाळी 8 वाजता मतदानाला सुरूवात झाली. 36 खोल्यांमध्ये मतदान केंद्र उभारले होते. सकाळच्या सुमारास मतदान धिम्या गतीने सुरू होते.

दुपारनंतर उत्स्फूर्तपणे उत्साह दिसून आला. मतदानासाठी मतदारांच्या प्रत्येक केंद्रावर रांगा लागल्या होत्या. तिन्ही गटाचे नेते, उमेद्वार व कार्यकर्ते मतदानासाठी येणार्‍या मतदारांचे स्वागत करत होते. सकाळी 10 वाजता फक्त 7.78 टक्के मतदान झाले. त्यानंतर हळूहळू मतदानाची टक्केवारी वाढत गेली. मतदार आपआपल्या साधनाने मतदान केंद्रावर येऊन मतदान करत होते. दिवसभर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. आज (रविवारी) राहुरीच्या लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे.

वाहतूकीची कोंडी
काल शनिवार असल्याने नगर-मनमाड महामार्गावर भाविकांची दिवसभर मोठी वर्दळ होती. डॉ. तनपुरे कारखान्याच्या मतदानामुळे यामध्ये अधिक भर पडली. नेहमीप्रमाणे जवळपास दोन तास वाहतूकीची कोंडी निर्माण झाल्याने मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यास उशिर होत होता. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांची मोठी दमछाक झाली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles