अंबाजोगाईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, एका सेवानिवृत्त शिक्षिकेला व्हॉट्सॲप कॉलवरून ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचा प्रकार घडलाय. सेवानिवृत्त शिक्षिकेला मनी लॉन्ड्रींग आणि अतिरेक्यांना फंडिंग केल्याचं सांगत तब्बल 83 लाख रुपयांना गंडवण्यात आलं आहे. चौकशीला सहकार्य करा सांगत फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी “विश्वास नांगरे पाटील यांचे नाव घेत ही फसवणूक केलीय.
विश्वास नांगरे पाटलांचे नाव सांगत फोन केला
 अंबाजोगाई येथील सेवानिवृत्त शिक्षिकेला मनी लॉन्ड्रीग आणि अतिरेक्यांना फंडिंग केल्याचे सांगत चौकशीला सहकार्य करा असे म्हणत व्हॉट्सॲप कॉल वरून तब्बल 83 लाख रुपये हडपल्याचा प्रकार अंबाजोगाईत झाला आहे. तुमच्या आधार कार्ड वरून दुसरे सिम कार्ड घेतले असून त्याचा दुरुपयोग झाल्याचे देखील बनावट कॉलद्वारे सांगण्यात आलेय.आम्ही तुम्हाला या प्रकरणातून सोडवू, यासाठी आम्हाला विश्वास नांगरे पाटील यांनी स्पेशल विनंती केल्याच देखील निवृत्त शिक्षिकेला फोन केलेल्या भामट्यांनी सांगितले.
संजय पिसे नावाच्या व्यक्तीने व्हाट्सअप व्हिडिओ कॉल करून आधी या निवृत्त शिक्षिकेला मुंबई पोलिसांचे बनावट ऑफिस, झेंडे,लोगो दाखवून डिजिटल अरेस्ट केली. त्यानंतर भीती दाखवून 21 ते 29 मे या दरम्यान तब्बल 83 लाख 1 हजार 816 रुपये उकळले. विशेष बाब म्हणजे निवृत्त शिक्षकेने भीतीपोटी सोने प्लॉट गहाण ठेवून त्यावर कर्ज काढत ही रक्कम दिल्याचे सांगितले.30 मे रोजी गुन्हेगारांनी व्हाट्सअप वरून ब्लॉक केल्यानंतर त्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली त्यानुसार शनिवारी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर पोलीस करत आहेत.
फसवणूक झालेल्या शिक्षिकेने भीतीपोटी स्वतःचे सोनं आणि प्लॉट गहाण ठेवून कर्ज घेतलं आणि ती रक्कम भामट्यांना ट्रान्सफर केली. अखेर 30 मे रोजी व्हॉट्सॲपवरून अचानक संपर्क तोडण्यात आला. त्यानंतर फसवणूक लक्षात येताच त्यांनी अंबाजोगाई सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी याप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.


