महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नागालँडमध्ये मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात आमदारांनी पक्षाची साथ सोडली असून ते सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये (एनडीपीपी) सामील झाले आहेत. त्यामुळे नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या पक्षाचं विधानसभेतील संख्याबळ वाढलं असून एनडीपीपीला विधानसभेत पूर्ण बहुमत मिळालं आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सात आमदारांनी पक्षाची साथ का सोडली? याचं कारण काय? या संदर्भातील माहिती आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचं कारण अजित पवारांनी सांगितलं आहे.
नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या सात आमदारांबाबत बोलताना अजित पवार काय म्हणाले की, “गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार मला भेटायला आले होते. त्या आमदारांची तेथे काहीही कामे होत नव्हती. त्यानंतर तेथील मुख्यमंत्र्यांबरोबर मी देखील बोललो होतो. त्या आमदारांमध्ये अस्वस्थता होती ही गोष्ट खरी आहे. पण आज आणि काल दोन दिवस मी आजारी होतो. त्यामुळे आता मी नागालँडमधील त्या आमदारांबाबत अधिक माहिती घेत आहे. पण सातही आमदार सत्ताधारी पक्षात गेल्यामुळे तेथे पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.


