Saturday, February 21, 2026

अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी वार्‍यांसह जोरदार पावसाची हजेरी

नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी (10 जून) सायंकाळनंतर अहिल्यानगर शहर, उपनगर व दक्षिण जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा तालुक्यात वादळी वार्‍यांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर शहरात ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस सुरू झाला.

सुमारे अर्धा ते एक तास हा पाऊस सुरू राहिला. शहर व उपनगरातील अनेक भागांत झाडांची फांद्या तुटल्या, तसेच काही ठिकाणी विजेच्या ताराही तुटल्या. त्यामुळे विजपुरवठा खंडित झाला. वादळी वार्‍यामुळे हातगाड्यांवर विक्री करणार्‍या लहान व्यापार्‍यांचे साहित्य भिजून नुकसान झाले. काही भागांत रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली.दरम्यान, दक्षिण जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी व श्रीगोंदा तालुक्यांतील अनेक भागांतही पावसाने जोरदार हजेरी लावली. या भागांत वार्‍याचा वेग अधिक असल्याने काही ठिकाणी शेतीच्या पीकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पारनेर, कर्जत, जामखेड तालुक्यांमध्ये देखील काही भागांत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने आधीच शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर आता पुन्हा पावसाने उपस्थिती लावल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. काही भागांत खरिपाच्या पेरण्यांच्या तयारीला वेग आला असला, तरी अचानक येणार्‍या वादळी पावसामुळे नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे.

पुढील २-३ दिवसांत नैऋत्य मोसमी वारे वेग घेईल. त्यामुळे राज्यात ३ ते ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

आज दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्ला येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles