‘सहकार से समृद्धी’ या आधारे ग्रामीण भागात परिवर्तन घडवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. देशात दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था (पॅक्स) स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्रत्येक गावात सहकारी संस्थांची माहिती डिजिटल डेटाबेसद्वारे संकलित करण्यात आली आहे. पॅक्स संस्थांना केवळ कृषीपुरते मर्यादित न ठेवता, २२ नव्या सेवाक्षेत्रांशी जोडण्यात येत आहे. यामध्ये जनऔषधी केंद्रे, गॅस वितरण, पेट्रोल पंप, रेल्वे तिकीट सेवा, टॅक्सी सेवा अशा सेवाक्षेत्रांचा समावेश आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी येथे राष्ट्रीय सहकार परिषदेत केले.
मुंबईतील हॉटेल फेअरमोंट येथे ‘सहकार से समृद्धी’ या राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे, माहिती तंत्रज्ञानमंत्री ॲड.आशीष शेलार आदी उपस्थित होते
‘अन्नदाता शेतकरी बांधवांना सक्षम करण्यासाठी देशात पहिल्यांदाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या राज्यांनी सहकारक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे,’ असे शहा म्हणाले. “नॅशनल टॅक्सी” या आगामी सहकारी उपक्रमात टॅक्सीचालक हेच वाहनाचे मालक असतील आणि नफा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. सहकाराच्या माध्यमातून महिला आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. देश सहकाराच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सहकार हा प्रमुख आधारस्तंभ ठरेल, असेही शहा यांनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी खरी शिवसेना कोणाची याची ओळख सर्वांना करून दिली असे सांगत शहा यांनी एकनाथ शिंदे यांचा यावेळी परिचय करून दिला. एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचे सांगत शहा यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.


