Saturday, February 21, 2026

पिंपळनेर ते पंढरपूर पालखी सोहळ्याच्या प्रस्थान ,वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये कुठलीही कमतरता भासू देणार नाही – सभापती राम शिंदे

वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये कुठलीही कमतरता भासू देणार नाही – सभापती प्रा. राम शिंदे

अहिल्यानगर, संस्कार आणि संस्कृती ही आपल्या देशाची व राज्याची खरी ओळख आहे. सामाजिक वैभवाचा सर्वोच्च अनुभव दिंडीच्या माध्यमातून मिळतो. निःस्वार्थ भावनेतून पांडुरंगाच्या ओढीने पंढरपूरच्या दिशेने पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये कुठलीही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली.

पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री संत निळोबाराय संजीवन समाधी स्थळास राज्यस्तरीय ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले असून, त्याअंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व पिंपळनेर ते पंढरपूर पालखी सोहळ्याच्या प्रस्थान सोहळ्यानिमित्त ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, निळोबाराय संस्थानचे अध्यक्ष अशोकराव सावंत, ह.भ.प. डॉ. नारायण महाराज जाधव, डॉ. विकासानंद महाराज मिसाळ, ह.भ.प. मोहनानंद पुरंदरवडेकर महाराज, ह.भ.प. समाधान महाराज शर्मा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, तहसीलदार गायत्री सौन्दणे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. राम शिंदे म्हणाले की, हजारो वर्षांची दिंडी परंपरा वारकरी संप्रदायाने श्रद्धेने जपली आहे. कुठलीही अपेक्षा न ठेवता संत व समाधान हेच सर्वश्रेष्ठ मानून वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी निःस्वार्थ भावनेने निघतो. या यात्रेतून मिळणाऱ्या आत्मिक समाधानाची तुलना इतर कुठल्याही सुखाशी होऊ शकत नाही. शासन व प्रशासन वारकऱ्यांच्या सोयींसाठी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे. या दिंडी सोहळ्यात स्वतः एक दिवस चालण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व दिंड्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, राज्यभरातून लाखो वारकरी दरवर्षी एकात्मतेचे दर्शन घडवत विठोबाच्या दर्शनासाठी निघतात. कोणाच्याही मदतीची अपेक्षा न ठेवता ऊन, पाऊस, वाऱ्याची तमा न बाळगता चालणाऱ्या या वारकऱ्यांचे आत्मिक समाधान सर्वोच्च आहे. या यात्रेसाठी शासनाने पुरेशा सुविधा उपलब्ध केल्या आहेत. पंढरपूर येथे दोन दिवस ‘कृषिमित्र’ म्हणून वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार काशिनाथ दाते म्हणाले की, पूर्वी अत्यंत कमी वारकरी या दिंडीत सहभागी होत असत. मात्र आता जिल्हाभरातून ६७ दिंड्या पिंपळनेर पालखी सोहळ्यात सहभागी होत असून, ही बाब तालुक्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. शासनाकडून संस्थानच्या विकासासाठी यावर्षी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

प्रास्ताविक करताना अशोकराव सावंत यांनी सांगितले की, दिंडीत सहभागी वारकऱ्यांसाठी शासनाने पिण्याचे पाणी, फिरते शौचालय, आरोग्य सुविधा, रुग्णवाहिका, प्रत्येक दिंडीसाठी २० हजार रुपये अनुदान, पावसापासून संरक्षणासाठी रेनकोट, तसेच वारी मार्गाची दुरुस्ती यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत निळोबाराय संस्थानसाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

डॉ. नारायण महाराज जाधव व ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांचीही समयोचित भाषणे झाली.

कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून निळोबाराय पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ करण्यात आली. विविध विकास कामांचे भूमिपूजनही यावेळी पार पडले.

कार्यक्रमास वारकरी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles