महानगरपालिकेच्या मालकीचे गाळे, वर्ग खोल्या, खुल्या जागांची आजपासून तपासणी मोहीम
पोटभाडेकरू आढळल्यास गाळे ताब्यात घेणार, अतिरिक्त बांधकाम असल्यास २० हजार दंड
तीन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तीन स्वतंत्र पथकांची नियुक्ती : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
अहिल्यानगर – महानगरपालिकेने स्वतःच्या मालकीचे व भाड्याने दिलेले गाळे, वर्ग खोल्या, खुल्या जागांची तपासणी करण्यासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तीन स्वतंत्र पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथके सर्व गाळ्यांची, खोल्यांची, खुल्या जागांची तपासणी करणार आहे. मूळ मालक नसल्यास व पोटभाडेकरू असल्यास गाळा तत्काळ ताब्यात घेण्यात येणार आहे. तसेच, मंजूर जगापेक्षा अधिक बांधकाम असल्यास दंड आकारण्यात येणार असून, अतिक्रमण केले असल्यास ते तत्काळ पाडण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.
महानगरपालिकेने उपायुक्त प्रियांका शिंदे, सहाय्यक आयुक्त सपना वसावा, निखिल फराटे यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकात ५ कर्मचारी देण्यात आले आहेत. शहरात महानगरपालिकेचे ७४२ गाळे, ८२ वर्ग खोल्या, ७४ खुल्या जागा, २ मंगल कार्यालये, ३ पे अँड पार्क, २ व्यायामशाळा भाड्याने देण्यात आल्या आहेत. या सर्व ठिकाणी तपासणीसाठी पथकांना क्षेत्र विभागून देण्यात आले आहे. महिनाभरात पथकांकडून तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे.
पथकांकडून मूळ मालक आहे की पोटभाडेकरू याची तपासणी करून पोटभाडेकरू असल्यास गाळा तत्काळ ताब्यात घेण्यात येणार आहे. तसेच, कराराची मुदत संपलेली असल्यास मुदत संपल्यापासूनचे आज पर्यंतचे भाडे वसूल करण्यात येणार आहे. भाडे जमा न केल्यास गाळा तत्काळ ताब्यात घेण्यात येणार आहे. तसेच, मंजूर जागा किंवा गाळ्यांच्या क्षेत्रापेक्षा अधिक बांधकाम असेल, पोट माळा केला असेल तर नियमानुसार २० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. गाळेधारकाने अतिक्रमण केले असल्यास तेही तत्काळ पाडण्यात येणार आहे. गाळेधारकांकडे २१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. वर्षभरात ६ कोटी रुपये वसूल झाले आहेत. ज्यांना रेडिरेकनर दरानुसार भाडे परवडत नसेल, त्यांनी गाळे ताब्यात द्यावेत. येत्या एक महिन्यात ही तपासणी पूर्ण करण्यात येणार असून १ मे नंतर थकबाकीदार गाळेधारकांवर कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.


