नगर शहरातील बंद रस्ते खुले करा
खा. नीलेश लंके यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे मागणी
अहिल्यानगर : प्रतिनिधी
नगर शहरातील संरक्षण विभागाच्या हद्दीतून जाणारे अनेक रस्ते जे मागील अनेक वर्षांपासून नागरिकांसाठी खुले होते ते संरक्षण विभागाकडून बंद करण्यात आले आहेत. हे रस्ते पुन्हा खुले करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची गुरूवारी भेट घेऊन केली.
अहिल्यानगरचे मा. नगरसेवक मुदस्सर शेख तसेच दरेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी बंद करण्यात आलेले रस्ते खुले करण्यासंदर्भात खासदार नीलेश लंके यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन खा. लंके यांनी संसदीय अधिवेशनादरम्यान गुरूवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत हे रस्ते खुले करण्याची मागणी केली.
न्यायालयाच्या नव्या इमारतीपासून भुईकोट किल्ल्याकडे जाणारा रस्ता, नटराज हॉटेलपासून सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कुलकडे जाणारा रस्ता, दरेवाडी ग्रामपंचायत हददीतील रस्ता व इतर अनेक रस्ते संरक्षण विभागाकडून बंद करण्यात आलेले आहेत.
हे रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांना शैक्षणीक, वैद्यकीय कामांसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे खा. लंके यांनी मंत्री राजनाथ सिंह यांच्या निदर्शनास आणून दिले. संबंधित विभागाशी चर्चा करून या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही मंत्री राजनाथ सिंह यांनी खा. नीलेश लंके यांना दिली.
बांधकामासाठी परवानगी नाही !
नगर तालुक्यातील वाकोडी, दरेवाडी, निंबोडी या गावांमध्ये संरक्षण विभागाच्या हद्दीजवळ असलेल्या गावांमध्ये शेतकरी तसेच ग्रामस्थांना स्वतःच्या जागेत बांधकाम करण्यासाठी आवष्यक ना-हरकत प्रमाणपत्र संरक्षण विभागाकडून देण्यात येत नाही. त्यासंदर्भात खासदार नीलेश लंके यांनी नगरच्या एम. आय.सी.ॲण्ड एस.च्या ब्रिगेडियर यांना बैठक घेण्याची मागणी केली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी बैठकीसाठी वेळ न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. या पार्श्वभुमीवर खा. लंके यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन ग्रामस्थांना न्याय देण्याची मागणी केली.
बेलेश्वर देवस्थानसाठी वीज आणि सुशोभीकरण
नगर शहरातील बुऱ्हानगर रस्त्यावरील लष्कराच्या हददीतील बेलेश्वर देवस्थानसाठी कायमस्वरूपी वीज व्यवस्था आणि सुशोभीकरणासाठी परवाणगी देण्यात यावी अशी मागणीही खा. लंके यांनी यावेळी केली. बेलेश्वर देवस्थान हे नगर शहर आणि तालुक्यातील जनतेचे श्रध्दास्थान आहे. त्यामुळे या देवस्थानासाठी कायमस्वरूपी वीज तसेच सुशोभीकरणाची परवागणी देण्याची मागणी खा. लंके यांनी मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली.
अधिवेशनानंतर बैठक
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीनंतर संसदीय अधिवेशन संपल्यानंतर बैठकीचे आयोजन करण्यासंदर्भात नगरच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सुचित केले आहे. या बैठकीत सकारात्मक मार्ग निघेल असा आशावाद खा. नीलेश लंके यांनी व्यक्त केला.


