शेवगाव-तिसगाव कक्षांतर्गत येणार्या करडवाडी येथील खडीक्रेशर उद्योगात 6 लाख 15 हजार 690 रुपयांची वीजचोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितचे सहाय्यक अभियंता पंकज अर्जुन देवरे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केली आहे. ही घटना 16 जुलै रोजी दुपारी उघडकीस आली.
 सहाय्यक अभियंता देवरे यांनी त्यांच्या सहकार्यांसह व दोन पंचांच्या उपस्थितीत कराडवाडी येथील स्वाती सुनिल टापरे (ग्राहक क्र. 146090000688) यांच्या खडी क्रेशर उद्योगावर छापा टाकला.तपासणीदरम्यान त्यांच्या उद्योगात डीपीवरील रोहीत्राच्या लघुदाब बाजूस थेट जमिनीवरून बारीक चार कोर असलेली केबल बायपासद्वारे जोडून विजेमार्फत थेट पुरवठा घेत असल्याचे निदर्शनास आले. ही जोडणी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता अनधिकृतपणे वापरात आणल्याचे स्पष्ट झाले. या घटनेत केबल सुमारे 30 ते 40 मीटर लांबीची असून ती मीटरद्वारे न नेता बायपास करून वापरण्यात आली होती. त्यामुळे महातिवरणचे 33,221 युनिट्सचे नुकसान झाले असून त्याची रक्कम 6 लाख 15 हजार 690 इतकी आहे.
त्यामुळे विद्युत कायदा 2003 अंतर्गत कलम 153 नुसार कारवाईसाठी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी अधिकार्यांनी पंचनामा करुन तात्काळ अनधिकृत वीजजोडणी खंडित केली. या प्रकाराचा पंचनामा दोन पंचांच्या व ग्राहक प्रतिनिधीच्या उपस्थितीत करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे करत आहेत. वीज वितरण कंपनीच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


