आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. कुठे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, तर कुठे नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे. अशाच घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावरून परतल्यानंतर शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग झाली आहे. मात्र, यावेळी विशेष चर्चेत असलेलं नाव म्हणजे तेजस ठाकरे.
शिंदेसेनेत सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे.अशातच नुकतंच पार पडलेल्या पक्षप्रवेशावेळी ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षातील नेत्यांसह तेजस ठाकरेंनीही पक्षप्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे आणि मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत त्यांनी धनुष्यबाण हाती घेतलं. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. दौऱ्याहून परतल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेत भव्य पक्षप्रवेश झाला. यवतमाळच्या नेर आणि महागांव तालुक्यातील ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी तेजस ठाकरेंनीही धनुष्यबाण हाती घेतलं आहे.
तेजस उद्धव ठाकरे नसून तेजस गोविंद ठाकरे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. ते सुरूवातीला भाजप कार्यकर्ते होते. तेजस ठाकरे यांच्या या राजकीय प्रवेशामुळे शिंदेसेनेला महागांव शहरासह तालुक्यात नक्कीच नवसंजीवनी मिळेल, असं बोललं जात आहे.


