Tuesday, November 4, 2025

अहिल्यानगर महानगरपालिका आयोजित गणेशोत्सव देखावे स्पर्धेसाठी २.३२ लाखांची रोख बक्षिसे जाहीर

महानगरपालिका गणेशोत्सव देखावे स्पर्धेसाठी पाच विषयांवर आधारित देखावे, पारंपरिक मिरवणुकीसाठी २.३२ लाखांची रोख बक्षिसे

स्वच्छता, वृक्ष लागवड, प्लॅस्टिक बंदी सारख्या सामाजिक विषयांवर प्रबोधनात्मक देखावे करावेत

पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तींचा अधिकाधिक वापर करावा : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

अहिल्यानगर – महानगरपालिका आयोजित सार्वजानिक गणेशोस्तव देखावे स्पर्धा २०२५-२०२६ यासाठी महानगरपालिकेच्या वतीने परीक्षण समिती नियुक्त करण्यात आली आहे. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडली असून यात पाच विषयांवर आधारित देखावे व पारंपरिक मिरवणूक यासाठी २.३२ लाखांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तींचा अधिकाधिक वापर करावा. मंडप परिसरात स्वच्छतेबाबत उपाययोजना कराव्यात, यासह स्वच्छता, वृक्ष लागवड, प्लॅस्टिक बंदी सारख्या सामाजिक विषयांवर प्रबोधनात्मक देखावे करावेत, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले.

बैठकीस उपायुक्त तथा गणेशोस्तव देखावे परीक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. संतोष टेंगले, सहाय्यक आयुक्त श्रीमती सपना वसावा, परीक्षण समितीचे सदस्य शशिकांत नजन (प्रसिद्धी व सांस्कृतिक विभाग प्रमुख), व्हिन्सेंट फिलिप्स (क्रीडा विभाग प्रमुख), श्रेणिक शिंगवी, संदीप जाधव, ठाकूरदास परदेशी आदी उपस्थित होते. गणेशोत्सव कालावधीत २ सप्टेंबर रोजी उपनगरात आणि ३ व ४ सप्टेंबर हे दोन दिवस अहिल्यानगर शहरातील गणेश मंडळांना परीक्षण समिती प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून परीक्षण करणार आहे. ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी पहाणी करण्यात येणार आहे.

आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे म्हणाले की, गणेश मंडळांनी स्वच्छता, प्लास्टिकमुळे होणा-या दुष्परिणामाबाबत जनजागृती व प्लास्टिक बंदी, बाल विवाह प्रतिबंध जनजागृतीबाबत, झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाव बेटी पढाओ अभियान, महिलांवर होणारे अत्याचार यावर आधारित देखावे सादर करावेत. शाडू मातीपासून बनविलेल्या गणेश मूर्तीचा वापर जास्तीत जास्त मंडळानी करावा व पर्यावरणाला त्याचा कोणताही धोका नसल्यामुळे या उपक्रमास प्राधान्य देण्यात यावे. तसेच मंडळ, मंडप परिसरात कचरा संकलनासाठी डस्टबीनाचा वापर करून मंडळाजवळील परिसर जास्तीत जास्त स्वच्छता राहील, याबाबत दक्षता घ्यावी. प्लास्टिक वस्तूचा वापर कटाक्षाने टाळावा. गणेश मंडळानी ओढे, नाले येथे गणेश मूर्तींचे विसर्जन न करता मनपाने ठरवून दिलेल्या विहिरीत किंवा मनपाने कृत्रिम पद्धतीने तयार केलेल्या जलकुंडात विसर्जन करावे, असे सांगितले.

देखाव्यांसाठी विषय १ – समाज प्रबोधनपर देखावे, स्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलन, पाणी बचत आदी व इतर समाज प्रबोधनपर देखावे, व्यसंनमुक्तीवर देखावे, प्लास्टिक मुक्ती, बेटी बचाव बेटी पढाओ, बाल विवाह प्रतिबंध बाबत जनजागृती, जागतिक महामारी वर देखावे, विषय – २ ऐतिहासिक देखावे, विषय – ३ धार्मिक व अध्यात्मिक देखावें, विषय – ४ जिवंत देखावे / आधुनिक तंत्रज्ञान देखावे या चार विषयांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक विषयांच्या गटात प्रथम रु. २५,००० व सन्मानचिन्ह, द्वितीय रु. १५,००० व सन्मानचिन्ह, तृतीय रु १०,००० व सन्मानचिन्ह या प्रमाणे पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच, गणेश विसर्जन मिरवणुकीत मराठमोळ्या संस्कृतीची जपवणूक करण्याऱ्या समाज प्रबोधनपर शिस्तबद्ध व पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढणाऱ्या मंडळांना प्रथम रु. १५००० व सन्मानचिन्ह, द्वितीय रु.१०,००० व सन्मानचिन्ह, तृतीय रु.७००० व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles