नगर: खरीप पीकविम्यासाठी शेवटच्या दिवसांपर्यंत जिल्ह्यातील 3 लाख 34 हजार 403 शेतकर्यांनी सहभाग नोंदविला आहे. 1 लाख 79 हजार 506 हेक्टरवरील पिकांसाठी विमा कवच मिळावे यासाठी 3 लाख 34 हजार 403 अर्ज दाखल झाले आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी प्रतिसाद मिळाला आहे. पोर्टल सेवा, आधार व सीएससी सर्व्हवरील व्यत्ययामुळे शेतकर्यांना वेळेत सहभागी होता आले नाही. त्यामुळे शासनाने पंतप्रधान पीकविमा योजनेस 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे 2025-26 या वर्षातील खरीप पिकांना अतिवृष्टी, सततचा पाऊस तसेच पावसाचा खंड आदीमुळे खरीप हंगामातील नुकसान झालेल्या पिकांना विमा कवच मिळावे यासाठी 31 जुलैपर्यंत पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. गेल्यावर्षी एक रुपयांत विमा हप्ता भरण्याची संधी शासनाने शेतकर्यांना उपलब्ध केली होती. त्यामुळे साडेसहा लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विमा कवच मिळावे यासाठी 11 लाखांपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले होते.
यंदाच्या वर्षी शेतकर्यांनी म्हणावा असा प्रतिसाद दिला नाही. शेवटच्या दिवसांपर्यंत 31 जुलैपर्यंत फक्त 3 लाख 34 हजार 403 अर्ज दाखल झाले आहेत. नेवासा तालुक्यातून सर्वाधिक 23 हजार 784 शेतकर्यांनी 34 हजार 554 अर्ज दाखल केले आहेत. सर्वात कमी श्रीगोंदा तालुक्यातील 4 हजार 813 शेतकर्यांनी 8 हजार 793 अर्ज दाखल केले आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या फारच कमी आहे. अर्ज करताना शेतकर्यांना आलेली तांत्रिक अडचण लक्षात घेऊन, शासनाने बिगर कर्जदार शेतकर्यांना सहभागी होण्यासाठी 14 ऑगस्ट तर कर्जदार शेतकर्यांसाठी 30 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.


