अवैध सावकारी रोखण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची बैठक संपन्न
अ. नगर : सावकारांच्या जाचाने पिडीत झालेल्या कर्जदार शेतकऱ्यांची व नागरिकांची पिळवणूक थांबविण्यासाठी तसेच अवैध सावकारी व्यवसायावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी शासन निर्देशानुसार गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीस सावकारांचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर मंगेश सुरवसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यासह जिल्ह्यातील सहकार विभागाच्या सर्व तालुका कार्यालयांचे सहाय्यक निबंधक उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले की, बेकायदेशीर सावकारीबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. अशी प्रकरणे निकाली काढताना सर्व संबंधितांना नोटीस पोहोच झाल्याची खात्री करूनच प्रकरणे गुणवत्तेवर निकाली काढण्याची सूचना त्यांनी दिल्या.
याचबरोबर विनापरवाना सावकारांकडून गरजू व्यावसायिक नागरिक व शेतकरी यांनी कर्ज घेऊ नये. सहकार खात्याकडून परवाना दिलेल्या परवानाधारक सावकारांकडूनच कर्ज घ्यावे. यामुळे अवैध सावकारीला रोखण्यास मदत होईल. जे कोणी अवैध सावकारी करून कर्जदारांना नियमबाह्य पद्धतीने व्याज आकारून त्रास देत असतील अशा व्यक्तीविरुद्ध सहकार विभागाकडे तक्रार दाखल करावी संबंधितांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे यावेळी डॉ. आशिया यांनी सुचित केले.
जिल्ह्यात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 मधील कलम 39 अन्वये अवैध सावकारी केल्याप्रकरणी २० गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अवैध सावकारीमुळे पीडित कर्जदार शेतकरी व नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन तक्रारी कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व सावकारांचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहिल्यानगर मंगेश सुरवसे यांनी केले आहे.


