Tuesday, November 4, 2025

अहिल्यानगरमध्ये भाजपा माजी नगरसेवकावर हल्ला ;पाच जणांना अटक

श्रीरामपूर-शहरातील भाजपाचे माजी नगरसेवक दीपक बाळासाहेब चव्हाण यांच्यावर बुधवारी रात्री गिरमे चौक परिसरात 5 ते 6 अनोळखी इसमांनी प्राणघातक हल्ला केला. जातिवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या धक्कादायक घटनेमुळे शहरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी 24 तासाच्या आत पाच जणांना अटक केली आहे.

दीपक बाळासाहेब चव्हाण हे बुधवारी (दि. 1 ऑगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास आपले सहकारी माजी नगरसेवक रवी रमेश पाटील यांच्याकडे काही कामानिमित्त गेले होते. काम आटोपून रात्री साडेदहाच्या सुमारास आपल्या घरी परतत असताना छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील गिरमे चौकाजवळ त्यांचा पाठलाग करत मोटारसायकलवरुन आलेल्या 5 ते 6 इसमांनी त्यांना अडवून अचानक हल्ला केला. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुला समाजसेवेचा पुळका चढला का? अशा अपमानास्पद जातिवाचक शब्दांत शिवीगाळ करत, त्यांच्या गळ्यातील अंदाजे दोन तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावण्यात आली. हल्लेखोरांनी अजून सुधारला नाहीस तर कायमचा काटा काढू अशी धमकीही दिली आणि तेथून पळ काढला.

या घटनेमुळे दीपक चव्हाण हे हादरून गेले. त्यांनी तत्काळ आपल्या मित्र माजी नगरसेवक रवी पाटील यांच्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. रवि पाटील व इतर सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणले. त्यांनी स्वतः हजर राहून सविस्तर तक्रार दाखल केली असून, मारहाणीमुळे वैद्यकीय उपचार घेण्यासाठी त्यांना साखर कामगार हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 अंतर्गत कलम 115(2) कलम 126(2) कलम 119 (1) कलम 189(2) कलम 190कलम 191 (2) कलम 351(2) कलम 352 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहे. दीपक चव्हाण यांनी दिलेल्या जबाबात त्यांनी हल्लेखोरांचे चेहरे स्पष्टपणे पाहिल्याचे नमूद केले असून, ते पुन्हा समोर आल्यास ओळखू शकतात, असे त्यांनी सांगितले आहे.दरम्यान, या घटनेनंतर श्रीरामपूरमध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. विविध संघटना, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी या घटनेचा निषेध करत हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकीय अथवा व्यक्तिगत वाद होते का, याचाही तपास पोलीस प्रशासन करत आहे.

दरम्यान पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून अरबाज जाकीर शेख (वय 24, रा. राममंदिर जवळ, वॉर्ड नं.05 श्रीरामपूर), हुजेब अनिस शेख, (वय 21, रा. मोरगेवस्ती टॉवर जवळ, वॉर्ड नं.07), समीर मोहम्मद शेख (वय 22, रा.लोणारगल्ली वॉर्ड नं. 05), आकाश राजेंद्र चौगुले (वय 23, रा. मोरगेवस्ती वॉर्ड नं.07), लक्ष्मण जनार्दन साबळे (रा. विजय हॉटेलच्या मागे, वॉर्ड नं.07 यांना अटक केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles