Sunday, November 2, 2025

जलजीवन व ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील प्रलंबित कामांचा अहवाल सादर करा –पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

जलजीवन मिशनमधील प्रलंबित कामांचा अहवाल सादर करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
जलजीवन, ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा आढावा
शिर्डी,– जलजीवन मिशन व ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत सुरू असलेल्या प्रलंबित कामांचा अहवाल चालू महिनाअखेर सादर करावा, अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष योजनांची पाहणी करावी, तसेच कामामुळे निर्माण झालेल्या रस्त्यांच्या प्रश्नांबाबत उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राहाता पंचायत समिती सभागृहात झालेल्या बैठकीत जलजीवन मिशन व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजनांच्या आढावाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी, तालुक्यातील कामांचा आढावा घेण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जलजीवन मिशनच्या अधीक्षक अभियंता सुनंदा नरवाडे, ग्रामीण पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंते गणेश भोगावडे, हितेंद्र चव्हाण, गटविकास अधिकारी विवेक गुंड आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, पाइपलाइन टाकताना रस्त्यांचे नुकसान झाले असून, तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे. लोणी बुद्रुक व लोणी खुर्द येथील योजना ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. ममदापूर येथील टाक्या व वाकडी येथील पाइपलाइनचे काम पर्यायी मार्गाने पूर्ण करावे. रस्ते खोदल्यानंतर माती उघड्यावर पडू नये यासाठी आवश्यक दक्षता घ्यावी.
धनगरवाडी येथील कामे तात्काळ पूर्ण करावीत. कडीत येथील जुन्या योजनांतील साचलेली घाण त्वरित काढावी. उन्हात पडून खराब झालेल्या पाइपलाइनच्या दुरुस्तीसाठी कार्यवाही करावी. सोनगाव योजनेसाठी आवश्यक जागा उपलब्ध करण्यासाठी महसूल व ग्रामविकास यंत्रणांमध्ये समन्वय ठेवावा. पाइपलाइनसाठी डांबरी रस्त्यांचे खोदकाम टाळावे. जिथे रस्ते खणण्यात आले आहेत, तेथील माहिती संकलित करून अहवाल सादर करावा.
निमगाव जाळी योजनेसाठी महसूल विभागामार्फत जागा उपलब्ध करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीत दाढ बुद्रुक, कोल्हेवाडी, शिंगवे, पिंपळवाडी-नपावाडी, कोर्‍हाडे वाळकी, खडकेवाके, डोऱ्हाळे, साकुरी, पुणतांबा तसेच जिल्हा परिषद योजनांमधील सावळीविहीर बुद्रुक, अस्तगाव, नांदुर्खी, पिंपरी निर्मळ, बाभळेश्वर, चितळी, जळगाव आणि संगमनेर तालुक्यातील आश्वी व चिंचोली या गावांतील कामांचा आढावा घेण्यात आला.
योजनेची कामे पूर्ण करताना संबंधित ठेकेदारांनी शासकीय यंत्रणांना विश्वासात न घेतल्याने गावातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यास जबाबदार असणाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. या संदर्भात लवकरच जिल्हाधिकारी व विभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेणार आहात, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles