महानगरपालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया
महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेतून शस्त्रक्रिया व उपचाराची सुविधा उपलब्ध : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
अहिल्यानगर – अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे दवाखाना व प्रसूतीगृहात महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेतून शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. गुरुवारी या योजनेअंतर्गत एका ४५ वर्षीय महिलेवर पहिली मोफत शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
महानगरपालिकेच्या कै. बा. देशपांडे दवाखाना व प्रसूतीगृह, तसेच सर्व आरोग्य केंद्रातून शहरातील नागरिकांना अधिकाधिक चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करत आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे. आता कै. बा. देशपांडे दवाखाना व प्रसूतीगृह या रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत या योजनांमधून शस्त्रक्रियाही केल्या जात आहेत.
गुरुवारी कै. बा. देशपांडे दवाखाना व प्रसूतीगृह येथे महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत या योजनेतून पहिली मोफत शस्त्रक्रिया एका ४५ वर्षीय महिला रुग्णावर यशस्वीरित्या पार पडली. महिलेस पाळीच्या रक्तस्त्रावाबाबत असलेल्या आजारासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेतील वैद्यकीय अधिकारी तथा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वृषाली पाटील, डॉ. कृतिका पाटील, भूल तज्ज्ञ डॉ. स्नेहलता सायंबर यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची आवश्यक देखभाल व काळजी रुग्णालय व्यवस्थापनाकडून घेण्यात येत आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनीही उपचार व सुविधाबाबत समाधान व्यक्त केले आहे.
महानगरपालिका नगरवासियांसाठी चांगल्या दर्जाची अत्याधुनिक आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी बुरुडगाव रोड परिसरात अद्ययावत रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. त्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. तसेच, सावेडी उपनगर परिसरात रुग्णालयाची इमारत उभी राहिली असून, लवकरच या ठिकाणीही रुग्णालय सुरू करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.


