केडगाव उपनगरात कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावावा, नागरिक त्रस्त
ग्रामस्थ आक्रमक; आयुक्तांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा
केडगाव उपनगरामध्ये कचऱ्याच्या प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये साथीचे आजार पसरले – सोन्याबापू घेबूड
अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निष्क्रियतेमुळे केडगाव उपनगरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कचरा उचलला जात नसल्यामुळे रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले असून, त्यातून उठणाऱ्या दुर्गंधीमुळे संपूर्ण परिसर अस्वच्छ झाला आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असून, डेंग्यू, मलेरिया, विषमज्वर यांसारख्या साथीचे आजार पसरू लागले आहेत. केडगाव उपनगरात घंटागाडी वेळेवर न येणं ही मुख्य समस्या ठरली आहे.
काही भागात तीन-चार आठवडे झाले तरी घंटागाडी फिरकलेली देखील नाही. त्यामुळे नागरिकांना घरामध्येच कचरा साठवावा लागत आहे. पर्याय नसल्यामुळे अनेक जण रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असून, यामुळे सार्वजनिक ठिकाणी दुर्गंधी व अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. दुकाने, घरे, शाळा, रुग्णालये या सर्व ठिकाणी ही समस्या तीव्रतेने जाणवत आहे. या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष सुरूच असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. सामाजिक कार्यकर्ते सोन्याबापू घेबूड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आयुक्तांना निवेदन दिले. यावेळी बोलताना घेबूड म्हणाले की, महापालिकेने जर दोन दिवसांत ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर आम्ही केडगावमधील सगळा कचरा थेट महापालिका मुख्य कार्यालयासमोर आणून टाकू. नागरिकांना आरोग्याचा प्रश्न भेडसावत असताना प्रशासन शांत आहे, ही लाजिरवाणी बाब आहे. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते सोन्याबापू घेबूड यांनी केले. यावेळी सुनील गुंड, ओंकार करपे, तुकाराम कोतकर, अक्षय कोंबरणे, अमोल गीते, कार्तिक पिंपळे, राहुल शिंदे, सोनू अहिरे, अनिकेत लोंढे, मनोज घेंबूड, विकी हुरूळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


