फसवणूक आणि अपहार करून उकळलेल्या पैशांतून नाशिकमध्ये हायप्रोफाईल जीवनमान जगणाऱ्या ‘ब्रोकर’ दाम्पत्याने नाशिकमधील तिघांकडून सव्वा दोन कोटी रुपये उकळले आहेत. विशेष म्हणजे इन्कम टॅक्स (आयटी) विभागाने माझ्या घरी टाकलेल्या छाप्यात सहा कोटींची ‘कॅश’ जप्त करुन आमचे 700 कोटींचे व्यवहार फ्रिज्ड केले आहेत, असे सांगून घरखर्चासाठी किमान पैसे द्या, असे आर्जव करून दोघांनी मदतीच्या बहाण्याने हे पैसे उकळल्याचे समोर आले आहे. त्यानुसार, शहर आर्थिक गुन्हेशाखेने संशयित ऋषिराज टेकाडे याला अटक केली असून त्याची पत्नी संशयित रविना टेकाडे हिचा शोध सुरु केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील परमोरी (पोस्ट अवनखेड) येथील शेतकरी ज्ञानेश्वर संपतराव तिडके हे इन्व्हेस्टमेंट ब्रोकर असून त्यांची ओळख सन 2024 मध्ये ऋषिराज याच्याशी झाली होती. यानंतर ओळख वाढत गेल्याने त्यांच्यात आर्थिक व्यवहार होत गेले आणि टेकाडे व तिडके कुटुंबांचे हितसंबंध वाढत गेले. जानेवारी 2025 मध्ये ऋषिराज याने तिडके यांना भेटून ‘माझ्यावर इन्कम टॅक्सची रेड पडली आहे, त्यात माझे व पत्नीचे सर्व बँक खाते फिज्ड (गोठविण्यात) केले आहेत. माझ्या मालमत्ता देखील जप्त केल्या असून छापा कारवाईत आयटीने घरातून सहा कोटी रूपये जप्त केले आहेत असे सांगितले. तसेच, कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यावर सातशे कोटींचा बॅलन्स असताना तो काढण्यास अडचण येत आहे. यातून कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागविणे, कठीण झाल्याने पन्नास लाख रुपये उसनवार द्यावेत अशी मागणी केली.
त्यामुळे तिडके यांनी व्यावसायिक व कौटुंबिक हितसंबंधातून टेकाडे दाम्पत्यासह त्यांच्या तीन ते चार एजंटाकडे वेगवेगळ्या कालावधीत एकूण 65 लाख 39 हजार रुपये दिले. त्यापैकी फक्त एक लाख तीस हजार रुपये टेकाडे याने परत केले आहेत. बरेच दिवस उलटूनही 64 लाख रुपये मिळत नसल्याने त्यांनी तगादा लावला, मात्र टेकाडे याने नानाविध कारणे सांगून वेळ मारून नेली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिडके यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली. दरम्यान, फसवणुकीतील रक्कम अडीच कोटींच्या घरात असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हेशाखेचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे यांच्याकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, कोल्हे यांनी ऋषिराज टेकाडे याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. तर त्याची पत्नी संशयित रविना टेकाडे हिचा शोध सुरु केला आहे. या दाम्पत्याने आणखी दोन जणांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.


