अहिल्यानगर: ”सिस्पे” घोटाळ्यात श्रीगोंदे, पारनेर, नगर शहरातील गोरगरीब जनतेचे १ हजार कोटी रुपये बुडाले. छोट्या गोष्टींवरून उपोषण, आंदोलन करणारे या विषयावर रस्त्यावर उतरायला का तयार नाहीत? या विषयावर तुम्ही गप्प का आहात? हे कोणाचे कार्यकर्ते होते? याचा सूत्रधार कोण? कोणाच्या निवडणुकीत हे कार्यकर्ते पुढे होते? मोटरसायकल वाटपास कोण उपस्थित होते? याची उत्तरे द्या, असे जाहीर आव्हान माजी खासदार सुजय विखे यांनी विद्यमान खासदार नीलेश लंके यांचे नाव न घेता दिले आहे. आपल्याकडे याचे व्हिडिओ आहेत, लवकरच पर्दाफाश करू, असा इशाराही त्यांनी दिला.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील जयंतीनिमित्त नगरमध्ये आयोजित केलेल्या ज्येष्ठ नागरिक सन्मान व शेतकरी दिनाच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सिस्पे व इन्फिनिटी हा गुंतवणूकदारांवर दिवसाढवळा टाकलेला दरोडा आहे. या प्रश्नावर एक तरी आंदोलन झाले का, जे छोट्या प्रश्नांवर उपोषणास बसतात, ते का गप्प आहेत. या विषयावर बोलायला कोणी तयार नाही. कोणी सांगितले होते की, या कंपनीचे संचालक माझे नातेवाईक आहेत? याचाही व्हिडिओ कार्यकर्त्यांनी सर्वांना दाखवावा, असेही आवाहन डॉ सुजय विखे यांनी
साकळाई पाणी योजनेवरूनही माजी खासदार विखे यांनी खासदार लंके यांच्यावर टीका केली. ते म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून साकळाई योजनेसाठी घोषणांचा पाऊस पडतो आहे. पण कामाचा पत्ता लागत नाही. निवडणुका आल्या की घोषणा होतात. मात्र या योजनेसाठी कोणी उपोषण केल्याचे किंवा मंडप टाकून चार दिवस बसल्याचे मला दिसले नाही. आता पुढील महिन्यात या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. भूमिपूजन होईल. ११०० कोटी रुपयांचा आराखडा तयार आहे. या योजनेमुळे दुष्काळी भागाला दिलासा मिळेल.


