लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा हफ्ता देण्यास सुरुवात झाली असतानाच दुसरीकडे 26 लाख लाडक्या बहिणींची चौकशी सुरु झाली आहे. पाहूया एक खास रिपोर्ट…
लाडकी बहिण योजनेची वर्षपूर्ती होत असतानाच सरकारने आता सगळं लक्ष अपात्र लाभार्थ्यांकडे वळवलं आहे. त्यासाठी प्रशासनाने अर्जांची पडताळणी सुरु केली आहे. निकषात न बसलेल्यांची चौकशी सुरु करण्यात आली असून अंगणवाडी सेविकांची त्यासाठी मदत घेतली जात आहे.लाडकी व्यतिरीक्त दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्यांची चौकशी सुरु झाली आहे. तसंच एका घरामध्ये दोन पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. मात्र दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेल्या तब्बल 26 लाख महिलांची यादी महिला व बालकल्याण विभागाने तयार केलीय. या सर्व महिलांची विभागानुसार चौकशी करायला सुरुवात करण्यात आली आहे.
एकीकडे अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाई सुरू झालेली असली दुसरीकडे ही योजना सुरुच राहणार असल्याची ग्वाही अदिती तटकरेंनी दिली आहे. पात्र लाभार्थ्यांना जुलै महिन्याचा हफ्ता मिळायला सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनापूर्वी सरकारने लाडक्यांना ओवाळणी दिली आहे. या योजनेचा लाभ सध्या दोन कोटी 29 लाख महिलांना मिळत आहे. मात्र ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर लाखो लाडक्या बहिणी यातून वगळल्या जाण्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे या योजनेत घुसखोरी करुन सरकारी पैशांवर डल्ला मारणाऱ्या 14 हजारांपेक्षा जास्त पुरुषांना नोटीस देऊन त्यांच्याकडून पैसे वसुल केले जाणार आहेत. त्यामुळे एक वर्षानंतर तरी गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे.


