शहरातील वकील मतदान पेटीला राखी बांधून लोकशाही रक्षणाची घेणार शपथ
लोकशाही आणि मतदान हक्काच्या रक्षणासाठी, राखी आता लोकशाहीसाठी! उपक्रम
बार असोसिएशनच्या माध्यमातून आगळा-वेगळा उपक्रम
नात्यांचं संरक्षणाबरोबर लोकशाहीचंही बंधनही स्वीकारावं -ॲड. कारभारी गवळी
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरातील वकिल वर्ग बार असोसिएशनच्या माध्यमातून देशातील लोकशाही आणि मतदान हक्काच्या रक्षणासाठी, राखी आता लोकशाहीसाठी! हा उपक्रम राबविणार आहे. गुरुवारी (दि.14 ऑगस्ट) महिला आणि पुरुष वकील मतदान पेटीला राखी बांधून लोकशाहीच्या रक्षणाचा संकल्प करणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश कातोरे पाटील, उपाध्यक्ष ॲड. वैभव आघाव, सचिव ॲड. संदीप बुरके, सहसचिव मनीषा केळगंद्रे, महिला सहसचिव जया पाटोळे, खजिनदार अनुराधा येवले, कार्यकारणी सदस्य अभिजीत देशमुख, रामेश्वर कराळे, निखिल ढोले, विजय केदार, दीपक आडोळे, शिवाजी शिंदे, ज्योती हिमणे आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 1,000 वकील सदस्य यामध्ये सहभाग नोंदवणार आहेत.
रक्षाबंधन हा सण बहिण-भावाच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि रक्षणाच्या वचनाचा प्रतीक मानला जातो. पण यावर्षी वकिलांनी या सणाला एका नवीन व सामाजिक अर्थाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मतदान हा फक्त हक्क नसून जबाबदारी आहे, आणि त्याचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची कर्तव्य असल्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे. राखी फक्त नात्यांसाठी नव्हे, तर देशासाठीही बांधूया! या भावनेने लोकशाहीशी भावनिक नाळ जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
भारतातील संविधानिक लोकशाही ही आपली खरी ओळख आहे. मतदान हा एक मौल्यवान अधिकार असून त्याचं संरक्षण केलं पाहिजे. रक्षाबंधन साजरा करताना आपण नात्यांचं संरक्षण करतो; यंदा त्याचबरोबर आपण लोकशाहीचंही बंधन स्वीकारावं, असे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती ही पारदर्शक व जबाबदार शासनाची तीन महत्त्वाची स्तंभ असल्याचे सांगत नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
नगर शहरातील वकील मतदान पेटीला राखी बांधून लोकशाही रक्षणाची घेणार शपथ
- Advertisement -


