मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवे वळण आले असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्याबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. जिल्हा कारागृहात त्याच्याकडे मोबाईल आढळल्याचा मुद्दा अद्याप चर्चेत असतानाच आता त्या मोबाईलचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) सार्वजनिक करण्याची मागणी होत आहे. ही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख शिवराज बांगर यांनी केली आहे.
शिवराज बांगर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कारागृहातील तपासादरम्यान जप्त झालेला मोबाईल प्रत्यक्षात वाल्मीक कराडच वापरत होता, आणि त्याचा सीडीआर मिळवून तो जनतेसमोर आणावा. केवळ एवढेच नव्हे तर, जिल्हा कारागृहातील शासकीय फोनवरून देखील वाल्मीक कराड बाहेरील लोकांशी संपर्क साधत असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. या दोन्ही संवाद माध्यमांचा गैरवापर होत असल्याने, संपूर्ण तपास होणे आवश्यक असल्याचे बांगर यांनी स्पष्ट केले.
“मी स्वतः जिल्हा कारागृह निरीक्षक तसेच संबंधित अधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन या दोन्ही फोनचा सीडीआर मिळवण्याची मागणी करणार आहे,” असे शिवराज बांगर यांनी ठामपणे सांगितले. या आरोपांमुळे जिल्हा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर आणि प्रकरणाच्या तपासाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या सर्व घडामोडींमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी वादंग माजण्याची शक्यता आहे, तसेच आरोपीच्या कारागृहातील विशेष ‘सोयी’बाबत नव्याने चर्चा सुरू होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान वाल्मिक कराडला राजकीय पाठिंबा आहे का ? हा प्रश्न आता जोर धरू लागला आहे.


