अत्याचार करणारा शिक्षक निलंबित प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणारे मात्र मोकाट
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संजय उत्तम फुंदे याच्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने शुक्रवारी तातडीने निलंबनाची कारवाई केली. दरम्यान, हे प्रकरण घडल्यानंतर सुरूवातील ‘अर्थ’ पूर्ण दबावाला बळी पडून हे प्रकरण दडपणाऱ्या पाथर्डीतील अधिकारी- कर्मचारी यांच्या विरोधात जिल्हा परिषदेच्या वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणारा कोण
आणि त्याच्यावर जिल्हा परिषद प्रशासन काय कारवाई करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गेल्या काही वर्षात नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका शिक्षण क्षेत्रात कुप्रसिध्द होताना दिसत आहे. राज्यात दरवर्षी दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी
प्रकरणाला आळा बसलेला असताना पाथर्डी तालुक्यात सर्रास कॉपीची प्रकरणे होताना दिसत आहेत. यासह शाळामधील विद्यार्थ्यांवर अत्याचाराच्या घटना या तालुक्यात वाढलेल्या दिसत आहेत. गेल्या काही वर्षात तालुक्यात असे दोन प्रकरणे घडली असताना वारंवार एकाच तालुक्यात असे का घडते, याचा विचार जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षण विभाग करताना दिसत नाही.अनेक वर्षापासून पाथर्डी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या योजना राबवताना मोठ्या प्रमाणात अनियमिता घडल्याच्या
तक्रारी आहेत.
सुरूवातीला या प्रकरणाचा गाजावाजा झाल्यानंतर अलगदपणे पाथर्डीतील ही प्रकरणे गायब झाल्याचे जिल्ह्याने अनुभवलेले आहे. असेच प्रकार तालुक्यातील शिक्षण विभागाच्या बाबतीत घडताना दिसत आहे. तालुक्याच्या पंचायत समितीत अनेक विभागात प्रभारी राज असून त्याच त्याच व्यक्तींकडे कार्यभार कसा सोपवण्यात येतो, असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे. यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी पाथर्डी तालुक्यात लक्ष देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, पाथर्डी तालुक्यातील अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी संबंधित शिक्षक फुंदे याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच निलंबित फुंदे याला कोपरगावमध्ये पंचायतच्या समितीच्यामुख्यालयात पदस्थापना दिलेली आहे.


