अहिल्यानगर-एमआयडीसी परिसरातील एका उद्योजकाकडून दोन जणांनी एकूण सहा लाख रूपये खंडणी म्हणून घेतल्याचा आणि भविष्यात कंपनीला कोणतेही काम मिळू न देण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी योगेश गलांडे व दत्तात्रय तपकीरे (पूर्ण नावे माहिती नाही, दोघे रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर) या दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी (9 ऑगस्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी चिरंजीव दत्तात्रय गाढवे (वय 31, रा. बोल्हेगाव फाटा, गणेश चौक, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. चिरंजीव यांची ‘डीएन इंजिनिअरिंग’ आणि ‘मनोहर इंजिनिअरिंग’ या कंपन्या असून त्या 2019 पासून एमआयडीसीतील एक्साईड इंडस्ट्रीज या नामांकित कंपनीला वर्क ऑर्डरनुसार जॉब वर्क पुरवत आहेत. कंपनीशी त्यांचा थेट संपर्क असून या व्यवहारात कोणतीही मध्यस्थी नसते. फिर्यादीच्या मते, ऑगस्ट 2023 मध्ये योगेश गलांडे याने त्यांना फोन करून स्वतः स्वराज्य कामगार संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सांगितले व सचिव दत्तात्रय तपकीरे याच्यासह प्रत्येक कामावर 10 टक्के रक्कम खंडणी म्हणून देण्याची मागणी केली.
अन्यथा, एमआयडीसी परिसरातील कोणत्याही कंपनीकडून त्यांना पुढे ऑर्डर मिळणार नाही, अशी धमकी दिली. वर्क ऑर्डर रद्द होऊन आर्थिक नुकसान होईल या भीतीने फिर्यादीने प्रथमच तीन लाख रूपये रोख दिले. यानंतर दोघांनी वारंवार पैशांची मागणी सुरू ठेवत ऑगस्ट 2023 ते आजपर्यंत विविध वेळेस एकूण सहा लाख रूपये रोख स्वरूपात घेतल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. काही महिन्यांपूर्वी फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना सतत धमक्या देण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
3 जून 2024 रोजी दत्तात्रय तपकीरे यांच्या मोबाईलवरून गाढवे यांना फोन करून दोघांनी मिळून पुन्हा पैशांची मागणी केली. नकार मिळाल्यावर भविष्यात कोणत्याही कंपनीकडून काम मिळू देणार नाही, अशी धमकी दिली. तसेच, वारंवार त्यांच्या एमआयडीसीतील शितल इंडस्ट्रीजच्या कार्यालयात बोलावून धमक्या दिल्या जात असल्याचेही फिर्यादीने नमूद केले. जुलै 2025 मध्ये भळगट कॅन्टीग येथे प्रत्यक्ष भेटून गलांडे याने पुन्हा धमकी दिल्यानंतर, अखेर भीती झुगारून गाढवे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींविरोधात खंडणी व धमकी देण्याचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड या बॅटरी उत्पादन करणार्या नामांकित कंपनीत पुरवठादारांकडून येणार्या कच्च्या मालाच्या वाहनांना अडवून, वाहनचालकांना दमदाटी व मारहाणीची धमकी देत खंडणीची मागणी करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. यासंदर्भात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून आता आणि एक खंडणीचा प्रकार समोर आल्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.