पाथर्डी : पतीला मारून टाकण्याची आणि आत्महत्या करण्याची धमकी देत चुलत दिराने सुमारे नऊ महिने वारंवार अत्याचार केल्याची फिर्याद तालुक्यातील एका गावातील महिलेने (वय 35) पाथर्डी पोलिस ठाण्यात दिली आहे.
आपल्या पतीसोबत येऊन महिलेने दिलेल्या या फिर्यादीत म्हटले आहे, की ऑगस्ट 2024 मध्ये सुरू झालेला हा प्रकार मे 2025 पर्यंत सुरू होता. आरोपी तिच्या पतीच्या चुलत काकांचा मुलगा आहे. दोघांची घरे शेजारी असल्याने त्यांचे नेहमी बोलणे आणि येणे-जाणे असायचे. ऑगस्ट 2024 मध्ये एका संध्याकाळी महिला शेतात एकटी काम करत असताना आरोपी तेथे आला आणि शारीरिक संबंधाची मागणी केली. महिलेने नकार दिल्यावर त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कोणाला सांगितले, तर पतीला मारून टाकीन किंवा आत्महत्या करीन अशी धमकी देऊन तो निघून गेला. भीतीपोटी महिलेने कोणालाही काही सांगितले नाही.
नंतर आरोपीने वारंवार घरी किंवा शेतात या महिलेवर अत्याचार केला. प्रत्येक वेळी धमकी देऊन तिला गप्प ठेवले. अखेर महिलेला त्रास असह्य झाल्याने तिने पतीला सर्व सांगितले. पतीने आरोपीला समजावले असता, त्याने यापुढे त्रास देणार नाही असे सांगितले.
मात्र, मे 2025 मध्ये पती बाहेरगावी गेल्यावर आरोपीने पुन्हा शेतात जाऊन महिलेवर अत्याचार केलाव धमकी दिली. आरोपी सतत महिलेवर नजर ठेवून राहत असल्याने आणि धमक्या देत असल्याने तिला जिवाची भीती वाटू लागली. अखेर 9 ऑगस्ट रोजी महिलेने पतीसोबत पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली.