अहिल्यानगर – जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक शाखेत नुकत्याच बदली होऊन आलेल्हया तहसीलदार श्रीमती ज्योती देवरे यांची आवघ्या २० दिवसातच पुन्हा बदली झाली आहे. त्यांच्या बदली आदेशात शासनाने अंशतः बदल करत त्यांना मालेगांवच्या अपर तहसीलदार पदी पदस्थापना दिली आहे.
श्रीमती ज्योती देवरे यांना ३१ जुलै रोजी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक शाखेत बदलीने पदस्थापना दिली होती. त्यानंतर अवघ्या २० दिवसातच त्यांच्या बदली आदेशात अंशतः बदल करण्यात आला असून त्यांना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तहसिलमध्ये अपर तहसीलदार या रिक्त पदी पदस्थापना देण्यात आली आहे. पारनेर तहसीलदार पदी कार्यरत असताना श्रीमती देवरे या त्यांच्या कामकाजामुळे वादग्रस्त ठरल्या होत्या. त्यानंतर त्यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली होती. मात्र ३१ जुलैला त्या नगरमध्ये बदली होऊन आल्या.आता पुन्हा त्यांची बदली झाली आहे.
सदरील बदली आदेश २१ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आला असून तो तात्काळ अंमलात येत असून संबंधित अधिकारी यांनी नमूद पदस्थापनेच्या पदावर तात्काळ रुजू व्हावे . दिलेल्या विहित कालावधीत संबंधित अधिकारी यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याची दक्षता घ्यावी. अन्यथा पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास, त्यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा “अकार्यदिन” म्हणून गणला जाईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे आदेशात स्पष्ट केले आहे.


