राज्यात सरकार आले तर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार, असे आश्वासन देत महायुती सरकार सत्तेत आले. पण अद्याप कर्जमाफीबाबत कोणताच निर्णय झाला नाहीये. दुसरीकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्जमाफीची मागणी जोर धरू लागलीय. त्याचदरम्यान राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी मोठं विधान केलंय. राज्यातील शेतकऱ्यांना योग्यवेळी कर्जमाफी दिली जाईल, असं विधान अजित पवार यांनी केलंय.
उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यात बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केलंय. गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफीची मागणी जोर धरू लागलीय. तसेच कृषीमंत्री आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी कर्जमाफीबाबत भाष्य केली आहेत. सरकार कर्जमाफीबाबत सकारात्मक असल्याचं सरकारमधील मंत्र्यांनी सांगितलंय. त्याचदरम्यान आज सातारा येथील दहिवडी येथे शरद पवार गटाचे अनिल देसाई यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या साताऱ्यातील पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी याबाबत विधान केलंय.
आम्ही कधीच कर्जमाफीच्या घोषणपासून बाजूला गेलो नाही. आमच्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीच सांगितलं होतं, त्याबाबत आम्ही ठाम आहोत. एखादा निर्णय कर्जमाफीचा बाबत घ्यायचा असेल, तर त्याची अंमलबजावणी करत असताना आर्थिक सगळ्या बाबी तपासाव्या लागणार आहेत.
यासाठी आम्ही एक कमिटी नेमलेली आहे. शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार नाही असं कधीच म्हणलेलो नाही योग्य वेळ आल्यावर नेमलेली कमिटी माहिती त्याबाबतीत देईल यानंतर योग्य वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी करणार आहोत, असे अजित पवार म्हणालेत. त्यामुळे सरकार कदाचित या दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफीचं गिफ्ट देऊ शकते असा अंदाज लावला जात आहे.
पेटा या संस्थेने केलेल्या कबुतरांच्या समर्थनार्थ केलेल्या जाहिरात बाजीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोण काय म्हणतं यापेक्षा कायद्याने संविधानाने सर्वोच्च न्यायालय हे अंतिम आहे. जर आपलं काही वेगळं मत असेल तर ते न्यायालयासमोर मांडावं. सर्वोच्च न्यायालय त्याबाबतचा निर्णय देईल. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबतचा निर्णय दिलेला आहे आणि त्या पद्धतीने अंमलबजावणी करणं हे सरकारचं काम आहे.


