महायुती सरकारने अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र, सोमवारी रात्री अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आल्याचा शासन आदेश जारी झाला. गृहराज्यमंत्री पंकज भोयर हे आता भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री असतील. तर संजय सावकारे यांचे एकप्रकारे डिमोशन करण्यात आले असून आता त्यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या असून संजय सावकारे यांचे डिमोशन का करण्यात आले, याची चर्चा रंगली आहे.
भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलल्याचा शासन आदेश सोमवारी रात्री राज्याचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी काढला आहे. या निर्णयामागे भंडाऱ्यात संजय सावकारे यांच्याबद्दल असलेली तीव्र नाराजी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. संजय सावकारे हे भंडाऱ्याचे पालकमंत्री असले तरी ते फक्त 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, जिल्हा नियोजनाच्या आढावा बैठक याव्यतिरिक्त जिल्ह्यात फारसे फिरकत नव्हते. त्यामुळे नागरिकांच्या अनेक समस्या प्रलंबित होत्या. या सगळ्यामुळे भंडाऱ्यातील नागरिकांकडून आम्हाला स्थनिक पालकमंत्री हवा, अशी मागणी केली जात होती. त्यामुळे संजय सावकारे यांची उचलबांगडी करुन त्यांच्याजागी पंकज भोयर यांना भंडाऱ्याचे पालकमंत्री म्हणून नेमण्यात आले असावे, असा अंदाज आहे. पंकज भोयर हे लगतच्या वर्धा जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने पंकज भोयर यांच्यावर भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे.
पालकमंत्री सावकारे म्हणून ते पूर्णकाळ उपलब्ध नसायचे
 * झेंडा टू झेंडा (15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी) ते भंडाऱ्यात येतं असे
 * भंडाऱ्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीनंतरही ते भंडाऱ्यात आले नव्हते
 * यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला होता
 * भंडारा जिल्ह्याची जाण असणाऱ्या जवळच्या जिल्ह्यातील मंत्र्यांना पालकमंत्री करावा, अशी नागरिकांची ओरड होती
 * पालकमंत्री सावकारे हे जिल्हा विकासाबाबत ठोस निर्णय घेण्यात सक्षम ठरले नाही
 * पालकमंत्री सावकारे हे जळगाव इथून येत होते. भंडाऱ्याला वेळ देण्यात ते कमी पडले आणि यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र
 * भोंडेकर यांची जिल्ह्यात हळूहळू ताकद वाढायला लागली होती
 * आगामी नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने पंकज भोयर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे


