आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ या आरोपीवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर हा हल्ला राजकीय षडयंत्रातून झाला असल्याचे आरोप खताळ समर्थकांनी केले असून मोर्चा देखील काढण्यात आला. मात्र आता आरोपी प्रसाद याची आई अनिता गुंजाळ यांनी संगमनेर शहर पोलिसांना आमदार खताळ यांच्याकडून माझ्या मुलाची आर्थिक फसवणूक करण्यात आल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचा लेखी तक्रार अर्ज दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
सदर तक्रार अर्जात अनिता आप्पासाहेब गुंजाळ यांनी म्हटले आहे, की मी प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ याची आई आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून, मी त्या घटनेचं समर्थन करत नाही. या घटनेचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. या घटनेचं राजकारण झालं तर आम्हाला न्याय मिळणार नाही. झालेली घटना ही आर्थिक देवाण-घेवाण आणि माझ्या मुलाच्या झालेल्या आर्थिक फसवणुकीतून घडलेली आहे. माझ्या मुलाला अमोल खताळ यांनी फसवलेलं आहे. त्याच्याकडून सह्या केलेले कोरे चेक पुस्तक घेऊन गेलेले आहेत.त्यामुळे मागील वर्षभरापासून माझा मुलगा प्रचंड मानसिक तणावात होता. वारंवार घरी पोलीस गाड्या पाठवून, त्याला ब्लॅकमेल केले गेले, त्याच्यावर दबाव टाकला गेला. त्याने बर्याचवेळा आत्महत्येचाही विचार केला. अमोल खताळ आणि प्रसाद गुंजाळ हे अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत. प्रसाद हा अमोल खताळ यांचा घरगुती मेंबर असल्यासारखा होता. अनेक कौटुंबिक कार्यक्रम त्यांनी एकत्र साजरे केलेले आहेत. वाढदिवसही त्यांनी एकत्र साजरे केलेले आहेत. माझ्या मुलाबरोबर अमोल खताळ यांचे बरेच आर्थिक व्यवहार होते. प्रसाद हा शेअर मार्केटमध्ये काम करायचा, त्यामध्ये गुंतवणुकीसाठी अमोल खताळ यांच्या मध्यस्थीने आणि त्यांच्यासमोरच काही आर्थिक देवाण-घेवाण झालेली आहे. यातील बरेच व्यवहार रोखीने झालेले होते, तसेच त्याची नोटरीही झालेली आहे.
सदर देवाण-घेवाण अमोल खताळ यांच्या कार्यालयातच झालेली आहे व ती रोख स्वरूपात झालेली आहे, हे सर्व कागदपत्रे आमच्याकडे उपलब्ध आहेत. मी या तक्रारीसोबत ते जोडत आहे. या सगळ्या संदर्भाने संगमनेर पोलीस स्टेशनमध्येच 2024 मध्ये अमोल खताळ, तेव्हाचे मथुरे साहेब, माझे पती, मुलगा आणि ज्यांना पैसे द्यायचे आहे त्यांची एकत्रित बैठकही झाली होती. पोलिसांना ते सर्व ठाऊक आहे. शेअर बाजारात मुलाला अपयश आल्यानंतर लोकांचे देणे देण्यासाठी मी त्याला त्याच्या वाट्याची जमीन दिली, ती त्यांनी विकली व त्यातून लोकांचे दिले. पैसे त्याने चेकने बँकेच्या अकाऊंटवरूनच परत केलेले आहे. तरीही बँकेत त्यांच्याकडे असलेले चेक पुन्हा टाकून त्याला फसवले गेले.
मागील काही दिवसांपासून त्याला सातत्यानं धमक्या दिल्या जात होत्या, त्याला ब्लॅकमेल केलं जात होतं, त्याच्यावर दबाव टाकला जात होता, तो प्रचंड मानसिक तणावात होता. याशिवाय माझा मुलगा गेल्या अनेक दिवसांपासून सारखा अमोल खताळ यांना भेटायचा आणि माझा विषय मिटवून द्या असे सांगायचा. शेवटी उद्विग्न अवस्थेतून त्याने हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे. मी त्याचे कोणतेही समर्थन करणार नाही. मात्र त्याला या टोकापर्यंत पोहोचायला भाग पाडणार्यांना मी आई म्हणून कधीही माफ करणार नाही. यामुळे आमची प्रचंड बदनामी झाली असून, जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यास आमदार अमोल खताळ, संदेश देशमुख आणि त्यांचे सहकारी जबाबदार असतील, असे अनिता गुंजाळ यांनी तक्रारीत म्हटले आहे.
प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ यांच्याशी झालेले आमचे सर्व आर्थिक व्यवहार हे व्यक्तीगत आहेत. या व्यवहारामध्ये आमदार अमोल खताळ यांचा कोणताही संबंध नाही. मात्र राजकीय हेतूने त्यांची बदनामी करण्यासाठी आमच्या आर्थिक व्यवहारांचा कोणताही उपयोग राजकारणासाठी करु नये, अन्यथा आम्हालाही कायदेशीर मार्ग अवलंबवावे लागतील असा इशारा प्रसाद गुंजाळ यांच्याशी आर्थिक व्यवहार केलेले रवींद्र ज्ञानदेव देशमुख यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रवींद्र देशमुख यांनी म्हटले आहे, की प्रसाद गुंजाळ हे शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय करत होते. मागील 20 वर्षांपासून त्यांची आणि माझी मैत्री आणि घनिष्ठ संबंध राहिले. सप्टेंबर 2023 मध्ये प्रसाद गुंजाळ शेअर ट्रेडिंगच्या व्यवसायात आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात देणेदारी झाली. यासाठी त्यांनी 32 लाख 50 हजार रुपयांची रक्कम इतरांची देणेदारी मिटविण्यासाठी मी देवू केली. सदर रक्कम एक महिना टप्प्याटप्प्याने परत करण्याचे आश्वासन दिले होते.
या रकमेचा एक भाग म्हणून 25 ऑक्टोबर, 2023 रोजी 5 लाख रुपये रोख स्वरुपात परत दिली व उर्वरित रक्कम प्रसाद गुंजाळ वेळेत देवू शकले नसल्याने त्यांनी 30 एप्रिल, 2024 रोजी संगमनेर येथील अॅक्सीस बँक शाखेचा 13 लाख रकमेचा धनादेश क्र.205439 दिला आणि दुसरा धनादेश क्र.205440 नुसार 14 लाख 50 हजार हा 20 मे, 2024 रोजी दिला. मात्र हे धनादेश बँकेच्या खात्यात भरुनही न वटल्याने मी त्यांना अॅड. एस. एम. जोंधळे यांच्या माध्यमातून 6 जून. 2024 रोजी नोटीस पाठवली. विशेष म्हणजे या सर्व आर्थिक व्यवहारांचा करारनामा 18 मार्च, 2024 रोजी नोटरी पब्लिक अॅड. डी. एस. वर्पे यांच्या समोरच करण्यात आला होता. झालेल्या फसवणुकीवरुन याबाबतची कायदेशीर प्रक्रिया आता सुरु असल्याचे रवींद्र देशमुख यांनी सांगितले.


