अहिल्यानगर-दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका तरूणावर चार जणांनी एकत्रितपणे हल्ला करून जखमी केल्याची घटना गांधी मैदान परिसरात रविवारी (31 ऑगस्ट) रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. गौरव ईश्वर सारसर (वय 40 रा. विद्या कॉलनी, कल्याण रस्ता, अहिल्यानगर) असे जखमी तरूणाचे नाव आहे. जखमी गौरव यांनी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात सोमवारी (1 सप्टेंबर) फिर्याद दिली. पोलिसांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.ऋषीकेश विजय मोरे (रा. केडगाव, अहिल्यानगर), सनी शिंदे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. सारसनगर, अहिल्यानगर), अक्षय शर्मा (पूर्ण नाव माहिती नाही, रा. माणिक चौक, अहिल्यानगर) व प्रमोक्ष पंजाबी (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. फिर्यादीनुसार, गौरव हे नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. रविवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ते आपल्या मित्र संजय सावरे यांच्यासह गांधी मैदानात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी लघवी करण्यासाठी ते सार्वजनिक स्वच्छतागृहात गेले. तेथे त्यांना ओळखीचे ऋषीकेश मोरे, सनी शिंदे, अक्षय शर्मा आणि प्रमोक्ष पंजाबी हे दिसले. हे सर्वजण मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी गौरवकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र पैसे नसल्याचे सांगितल्यावर संशयितांनी शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यात ऋषीकेश मोरे याने लोखंडी रॉडने गौरवच्या डोक्यात प्रहार केला.
या हल्ल्यात गौरव जखमी झाले असून त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला. झटापटीत त्याच्या शर्टच्या खिशातील दोन हजार रूपये हरवले. त्यानंतर संजय सावरे यांनी त्यांना दुचाकीवरून जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.


