लोकप्रिय टिव्ही अभिनेता आशिष कपूरला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. महिलेने आशिषने आपल्यावर बाथरूममध्ये अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.बलात्कार प्रकरणी आशिष कपूरला बुधवारी पुण्यात अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने सुरुवातील दोन पुरूषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले. तसेच एका महिलेने शारीरिक छळ देखील केला. शेवटी महिलेने आशिष कपूरने तिच्यावर बलात्कार केल्याचे सांगितले. महिलेने आरोपात असेही म्हटले आहे की, बलात्काराचा व्हिडीओ शूट करण्यात आला. मात्र अद्याप पोलीसांना कोणताही व्हिडीओ सापडला नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, आशिष कपूर आणि त्या महिलेची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर ती महिला आशिष कपूरच्या एका मित्राच्या घरी पार्टीसाठी गेली. आशिषने तिला बोलावले होते. तेव्हा ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने 11 ऑगस्टला आशिष कपूर, त्याचा मित्र, मित्राची बायको, दोन इतर अनोळखी पुरुष यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल केले. त्यानंतर 18 ऑगस्टला महिलेने आशिष आणि त्याच्या मित्राने बलात्कार केल्याचे सांगितले. तसेच तिला मारहाण देखील केल्याचे म्हटले आहे.
रिपोर्टनुसार, पीडित महिला आणि आशिष कपूर पार्टी सुरू असताना बाथरूममध्ये गेले. ही पार्टी दिल्लीत एका मित्राच्या घरी होती. बाथरूममधून बराच वेळ झाला तरी ते न आल्यामुळे मित्र बाथरूमचा दरवाजा ठोठावू लागले. दरवाजा उघडल्यावर मित्रांमध्ये वाद झाले. तेव्हा मित्राच्या बायकोने पीडित महिलेला मारहाण केली.


