पारनेर: तालुक्यातील भाळवणी येथील विजयागंगा स्कूल ऑफ नर्सिंग कॉलेजमधील 21 वर्षीय विद्यार्थिनीने तरुणाच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आठ दिवसांनी उघडकीस आली आहे.
या घटनेत तरुणाने वारंवार फोन करून त्रास दिल्याने, पैशांची मागणी केल्याने या त्रासाला कंटाळून या विद्यार्थिनीने खोलीमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
रोशनी असे मृत तरुणीचे नाव असून, हर्षदीप ताटके हा रोशनी हिस त्रास देत होता. पारनेर पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. 1) रात्री आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा त्याच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे.
रोशनीचे वडील अरुण गंगाराम तेलगुटे यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी यांची मृत मुलगी रोशनी ही सन 2023पासून विजयागंगा स्कूल ऑफ नर्सिंग कॉलेज येथे नर्सिंगचे शिक्षण घेत होती.
अखेरच्या वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या रोशनी हिची लवकरच परीक्षा होणार होती. तिने तिच्या वडिलांना फोन करून मला 15 हजार रुपये पाठविण्यास सांगितले होते. त्यावर त्याच रात्री भाळवणी येथून रोशनी हिच्या वडिलांना फोन आला की तुमच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
रोशनीचे वडील, तिचे नातेवाईक भाळवणी येथे पोहोचले असता तिच्यासोबत राहणार्या विद्यार्थिनींकडे चौकशी करण्यात आली असता हर्षदीप ताटके हा रोशनीसोबत 10-20 दिवसांपासून भांडत होता. तिला पैशांची मागणी करत होता. तिचा फोन व्यस्त लागला म्हणून संशय घेऊन तिला त्रास देत होता. त्यामुळे ती खूप तणावात होती.
अभ्यासही करत नव्हती अशी माहिती पुढे आली. याच मुलाने इयत्ता 10वीमध्ये शिकत असताना रोशनीस त्रास दिला होता. त्या वेळी त्याच्या वडिलांना त्यास समजावून सांगण्याबाबत रोशनी हिच्या वडिलांनी सांगितले होते. रोशनी हिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी हर्षदीप ताटके याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पारनेर पोलिस करत आहेत.


